चिठ्ठीत मोदींचं नाव लिहून शेतकऱ्यानं केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 03:32 PM2018-04-11T15:32:59+5:302018-04-11T15:32:59+5:30
आत्महत्येसाठी मोदींना धरलं जबाबदार
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. यवतमाळमध्ये एका ५५ वर्षीय शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. विष प्राशन करुन त्यांनी आपलं जीवन संपवलं आहे. नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे आत्महत्या करत असल्याचं या शेतकऱ्यानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं आहे. याशिवाय त्यानं मोदी सरकारला आत्महत्येसाठी जबाबदार धरलं आहे.
यवतमाळच्या घाटनजीमधील राजुरवाडीत राहात असलेल्या शंकर भाऊराव चायरे यांनी मंगळवारी आत्महत्या करुन आयुष्य संपवलं. शंकर चायरे यांनी आत्महत्येपूर्वी सहा पानी चिठ्ठी लिहिली. 'मी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत आहे आणि माझ्या आत्महत्येला मोदी सरकार जबाबदार आहे,' असे चायरे यांनी चिठ्ठीत म्हटलं आहे. यासोबतच चायरे यांनी त्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचं आवाहन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे आमदार राजू तोडसम यांना केलं आहे.
शंकर चायरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. 'त्या चिठ्ठीत पंतप्रधान मोदींच्या नावाचा उल्लेख आहे. शंकर चायरेंनी त्यांच्या आत्महत्येसाठी मोदींनाच जबाबदार धरलं आहे. मात्र आम्ही अद्याप त्या चिठ्ठीची सत्यता तपासत आहोत,' असे यवतमाळचे पोलीस अधीक्षक राज कुमार यांनी सांगितले. चायरे यांच्या नावावर नऊ एकर शेती आहे. त्यांच्यावर बँका आणि सावकरांचं १.४० लाख रुपयांचं कर्ज होतं. त्यामुळे ते तणावाखाली होते. याशिवाय बोंडअळीमुळे त्यांच्या शेतातील कापसाचं मोठं नुकसान झालं होतं.