दोन्ही सरकारची कर्जमाफी फसवी; संग्रामपूरच्या शेतकऱ्याने होर्डींग’उभारून केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 18:15 IST2020-10-18T18:14:45+5:302020-10-18T18:15:06+5:30
Farmer Protest through Hording in Buldhana District दोन्ही सरकारने दिलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप त्यामध्ये केला.

दोन्ही सरकारची कर्जमाफी फसवी; संग्रामपूरच्या शेतकऱ्याने होर्डींग’उभारून केला निषेध
संग्रामपूर : राजकीय नेत्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याने राज्यकर्त्यांवरचा शेतकऱ्यांचा विश्वास उडत चालला आहे. त्याचे उदाहरण संग्रामपूर तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यातील भिलखेड येथील अत्यल्प भूधारक शेतकरी दोन्ही कर्जमाफीतून वंचित असल्याने आजी-माजी मुख्यमंत्र्यांचे डिजिटल बोर्डावर शेतात फोटो लाऊन निषेध केला आहे. दोन्ही सरकारने दिलेली कर्जमाफी योजना फसवी असल्याचा आरोप त्यामध्ये केला.
सरकार कोणत्याही पक्षाचे असो, ते शेतकरी विरोधीच असल्याचा संदेश त्यातून दिला जात आहे. निळकंठ लिप्ते यांच्याकडे भिलखेड शिवारातील गट क्र. ३० मध्ये अडीच एकर शेती आहे. या एका हेक्टर शेतीवर सन २०११ साली ठिबक सिंचन संचाकरिता ४२ हजार रुपयांचे कर्ज घेतले. त्याच वर्षात २८ हजार रुपये पीक कर्ज काढले. सन २०११ पासून २०१५ पर्यंत ठिबक संचासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरले. मात्र नापिकीमुळे २०१५ ला हे कर्ज थकीत झाले. तसेच पूर्वी २८ हजाराच्या पीक कर्जावर शासनाच्या योजनेप्रमाणे दोन वेळा प्रत्येकी ३० हजाराचे पुनर्गठन केले. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देण्यासाठी २४ जून २०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. निकष जाहीर झाले. त्यानुसार दीड लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्यात आले. याहून अधिकची रक्कम असलेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम भरून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. शासनाच्या आवाहनानुसार अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज केला. या शेतकऱ्यावर दोन्ही कर्जाची व्याजासह एकूण रक्कम १ लाख ४७ रूपये थकीत होती. शासनाच्या ग्रीन लिस्टमध्ये या शेतकऱ्याचे नाव आले. मात्र, केवळ ४७ हजार रुपयांचीच कर्जमाफी प्राप्त झाली. दीड लाखाच्या आत थकीत कर्ज असल्यावर सुद्धा तत्कालीन सरकारच्या कर्जमाफीचा लाभ पूर्णपणे या शेतकऱ्याला मिळाला नाही. कालांतराने सत्ता बदल होऊन महाविकास आघाडी सत्तेत विराजमान झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर २०१९ मध्ये हिवाळी अधिवेशनात महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफीची धोषणा केली. १ एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ थकीत असलेल्या शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंत चे कर्ज माफ करण्यात आले. मात्र यावेळीही या शेतकऱ्याला पूर्णपणे लाभ मिळाला नाही. १ लाख रुपये कर्ज थकीत असताना त्या शेतकऱ्याला केवळ २८ हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. त्यांच्याकडे व्याजासह ७८ हजार रुपये बँकेचे कर्ज थकीत आहे. दोन्हीही कर्जमाफी मध्ये शासनाच्या घोषणेप्रमाणे पात्र असतानासुद्धा या शेतकऱ्याला अर्धवट कर्जमाफी देऊन थट्टा करण्यात आली. त्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.