मनमानीमुळे शेतकरी हैराण
By admin | Published: September 10, 2016 01:21 AM2016-09-10T01:21:07+5:302016-09-10T01:21:07+5:30
उरळगाव हे शिरूर तालुक्यातील महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते.
पुणे : उरळगाव हे शिरूर तालुक्यातील महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. गावात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असूनही एका गावकामगार तलाठ्याने नागरिकांच्या नाकी नऊ आणले आहेत.
उरळगावचे कामगार तलाठी के. एम. जाधव यांच्या मनमानी व हम करे सो कायदा यानुसार गावकऱ्यांना हेलपाटे आता नित्याचेच झाले आहे. या कामगार तलाठ्याला उरळगाव हा सज्जा मंगळवार, गुरुवार दिलेला आहे. या दिवशी तर हजर होत नाहीत; उलट नागरिकांचे मृत्यू नोंद, खरेदी खत नोंद ही प्रामुख्याने ‘शिरूर, न्हावरे येथे या; तुमचे काम होईल’ सांगतात. नागरिक कामधंद्या सोडून सांगितलेल्या ठिकाणी दिवसभर वाट पाहत बसतात. संध्याकाळ होईपर्यंत ते येत नाहीत हे कळाल्यावर ‘वाट’ पाहणाऱ्या नागरिकांना नाइलाजाने घरची ‘वाट’ धरावी लागते.
सातत्याने हेलपाटे मारूनही काम होत नसल्याने शेवटी फोन केला असता, ‘मीटिंग होती, आलो नाही. काम नंतर करू. माझे कोण वाकडे करू शकणार नाही, कोणालाही सांगा’ अशी उद्धट आणि अरेरावीची उत्तरे शतेकऱ्यांना ऐकावी लागत आहेत. (वार्ताहर)
>तक्रारींना केराची टोपली : माझं कुणी काहीही करू शकत नाही याबाबतची तक्रार शिरूर तहसीलदार, प्रांत अधिकारी यांना दिलेले आहे. मात्र, काहीही कारवाई होत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी सोसायटी मंजूर करण्यासाठी ७/१२ वर ऊसपीक लावण्यासाठी चेअरमनकडे जावे लागत आहे. त्यांनी भाऊसाहेबांना फोन लावला, तर ‘मी मीटिंगमध्ये आहे,’ असे सांगतात. पंरतु, भाऊसाहेब हे न्हावरे गावात फिरताना दिसतात, असे शेतकऱ्यांनी सांगितले.
भाऊसाहेबांचा भाऊसाहेब कोण?
प्रांत अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊनही येथील भाऊसाहेबांवर काहीच कारवाई होत नसल्याने भाऊसाहेबांचा भाऊसाहेब कोण? असा प्रश्र आता येथील शेतकऱ्यांना पडला आहे.