‘त्या’ शेतकऱ्याला मारहाण झालीच नाही
By admin | Published: April 1, 2017 03:19 AM2017-04-01T03:19:28+5:302017-04-01T03:19:28+5:30
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी मंत्रालयात आलेले शेतकरी रामेश्वर भुसारी यांना पोलिसांकडून
मुंबई : गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मागण्यासाठी मंत्रालयात आलेले शेतकरी रामेश्वर भुसारी यांना पोलिसांकडून मारहाण झाली नसल्याचा खुलासा राज्य सरकारने केला आहे. उलट त्यांनीच लिफ्टमध्ये लाथा-बुक्के मारण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ केली, त्यानंतर नायलॉनच्या दोरीने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. त्यांना वाचविण्याच्या प्रयत्न करणाऱ्या पोलिसाचाही भुसारी यांनी हाताचा चावा घेतला. हात सोडविण्याच्या प्रयत्नात पोलिसाचा हात भुसारे यांच्या ओठाला लागला व तो फाटला, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घाटशेंद्री गावातील शेतकरी रामेश्वर भुसारे २३ मार्चला मंत्रालयात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेले होते. गारपिटीत त्यांनी स्वखचार्तून बांधलेल्या शेडनेटचे नुकसान झाले होते. कायद्याने त्यांना याची नुकसानभरपाई मिळत नाही. शासकीय योजनेतून शेडनेट तयार करण्यासाठी बँकेने त्यांना कर्ज देण्याचीही तयारी दाखवली. पण, यासाठी लागणारी २५ टक्के रक्कम त्यांनी भरली नाही. त्यामुळे पुढच्या मदतीसाठी ते मंत्रालयात आले होते. तेथे पोलिसांकडून त्यांना मारहाण झाल्याचे त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितले. पण, पोलिसांनी त्यांना मारहाण केली नाही, असे गृहराज्यमंत्र्यांनी सांगितले.
भुसारे यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विरोधी पक्षांचे नेते राधाकृष्ण विखे पाटील तसेच धनंजय मुंडे व इतर सदस्यांनी मरीनड्राइव्ह पोलीस ठाण्याला भेट दिली तेव्हा वरिष्ठ निरीक्षकांना त्यांच्या सहकाऱ्याने भुसारे यांना न्यायालयात नेत असल्याचे सांगण्यात आले होते. ती प्रक्रिया सुरू होती. तोपर्यंत त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यामुळे वरिष्ठ निरीक्षकांनी जाणूनबुजून सदस्यांची दिशाभूल केली, असे म्हणता येणार नाही. परंतु, भुसारे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना सहानुभूतीची गरज आहे. त्यामुळेच त्यांच्या
पाठिशी उभे राहण्याचे शासनाने ठरवले आहे. गारपिटीत झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी तसेच बँकेकडून त्याला कर्ज मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे ठरविले आहे, असे गृहराज्यमंत्री पाटील यांनी सांगितले.
निवेदनानंतर काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी भुसारे यांच्या दाव्यावर आधारीत जबाब नोंदवून एफ.आय.आर. दाखल का केला गेला नाही, असा सवाल केला. तसे करण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी आम्हा सर्व सदस्यांसमोर मान्य केले होते. तसा कायदाही आहे, असेही पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)