फांद्या शेतात टाकल्याच्या वादातून शेतकऱ्याची हत्या
By admin | Published: July 7, 2015 05:04 AM2015-07-07T05:04:47+5:302015-07-07T05:04:47+5:30
शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला़
अंथुर्णे (पुणे) : शेतीच्या बांधावरून झालेल्या वादात भरणेवाडी (ता. इंदापूर) येथे शेतकऱ्याने शेजारच्या शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला़
नामदेव गंगाराम पोरे (वय ५८) असे त्याचे नाव आहे़ सुरुवातीला पोलिसांनी जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, नामदेव पोरे यांचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी वालचंदनगर पोलिसात तांत्रिक अडचणीमुळे रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी बाळू पोरे व पांडुरंग पोरे यांना अटक केली आहे.
याबाबत पोरेवाडी येथे राहणारे दादा नामदेव पोरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोरे यांचे शेळगाव हद्दीत शेत (गट नंबर १५५०) आहे. यात ५ जुलै रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास शेजारचे शेतकरी बाळू बापू पोरे याने बांधावर असणारे गवत व सुबाभळीच्या फांद्या उपटून दादा पोरे यांच्या शेतात टाकल्या. त्याची विचारणा दादा पोरे यांचे वडील नामदेव गंगाराम पोरे, आई जनाबाई नामदेव पोरे यांनी केली. त्यानंतर वाद झाल्याने बाळू बापू पोरे याने नामदेव पोरे यांच्या डोक्यात धारदार कुऱ्हाडीने जबरी वार केले. तर पांडुरंग बापू पोरे याने जनाबाई नामदेव पोरे यांना काठीने मारहाण केली. मंगल बापू पोरे हिने शिवीगाळ व दमदाटी केली.
या मारहाणीत नामदेव पोरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना पुणे येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. उपचारादरम्यान ६ जुलैला त्यांचा मृत्यू झाला. (वार्ताहर)