...ते शेतकरी आंदोलन दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी : सदाभाऊ खोत यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 04:03 PM2021-02-02T16:03:43+5:302021-02-02T16:04:32+5:30
शेतकऱ्याच्या आडुन काँग्रेस आणि डावे पक्ष दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी कामाला लागले आहेत.
बारामती : कृषि कायद्यामध्ये जरुर सुधारणा सुचवाव्यात,मात्र, हे कायदे रद्द झाल्यास शेतकऱ्याच्या पायातील बेड्या सुटणार नाहीत. कायदे मागे घेण्यासाठी सुरु असलेले आंदोलन शेतकऱ्याला गुलाम बनवुन दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी सुरु आहे. शेतकऱ्याच्या आडुन काँग्रेस आणि डावे पक्ष त्यासाठी कामाला लागले आहेत अशी टीका शेतकरी क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केली आहे. काही नक्षलवादी विचारसरणीचे दहशतवाद माजविणारे यामध्ये घुसले आहेत.परंतु महाराष्ट्रातील जनता,इतर राज्य मोदींच्या मागे असल्याचा दावा शेतकरी क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी केला.
बारामती येथे खोत हे न्यायालयीन कामकाजासाठी मंगळवारी (दि २) आले होते.यावेळीअशी टीका शेतकरी नेते न्यायालयीन कामकाज पुर्ण झाल्यानंतर खोत पत्रकारांशी बोलत होते.यावेळी खोत पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या नावाने काहीजण गळे काढत आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना काय वागणुक दिली याचा तपास करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचे जाणते नेते पुतनामावशीचे प्रेम दाखवतात,असा टोला शेतकरी क्रांती मोर्चाचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी लगावला.
शेतकरी नेते शरद जोशी आणि महेंद्रसिंग टीकेत यांनी ३२ वर्षापुर्वी दिल्लीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन उभे केले होते.त्यावेळी महेद्रसिंग टीकेत यांनी गुंडागर्दी करणारे लोक हाताशी धरत जोशी ना व्यासपीठावरुन ढकलुन दिले.सरकारने आंदोलन मोडीत काढले.त्यावेळी लाखो शेतकरी त्यावेळी माघारी परतला.राकेश टिकेत यांच्या डोळ्यातील अश्रु पाहुन मला या घटनेची आठवण झाली. जातीवंत शेतकरी दंगा करु शकत नाही,या मताशी मी सहमत आहेत. मात्र, राकेश टीकेत त्यांच्या वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाला तिलांजली देत आहेत. भावनेवर लोक जमा झाले आहेत.मात्र, हे लोक शेतकऱ्यांचे बाजारपेठेच स्वातंत्र्य हिरावुन घेत आहेत.
कृषि कायद्यात सुधारणा व्हावी,ही भूमिका रयत क्रांती संघटनेचा शेतकरी नेता म्हणुन आहे.अत्यावश्यक वस्तु कायदा पूर्ण रद्द करा, शेतमाल निर्यातीवर बंधन लावु नका,अनावश्यक शेतीमान आयात रद्द करा,आदी आमच्या मागण्या असल्याची भूमिका खोत यांनी केली.