Farmer News: शेतकऱ्याचा नादच खुळा; घोड्यांना जुंपले औताला, मशागतही गतीने...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 09:14 AM2022-04-04T09:14:14+5:302022-04-04T09:18:41+5:30
Farmer News: ट्रॅक्टरने शेती मशागत आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आणि बैलांना पोसणेदेखील जमत नाही. अशा स्थितीत वाशिम तालुक्यातील भाऊराव धनगर नामक शेतकऱ्याने चक्क राजा आणि तुळशा अशी नावे असलेल्या दोन प्रशिक्षित घोड्यांना औताला जुंपून शेत मशागत आरंभली आहे.
- सुनील काकडे
वाशिम : ट्रॅक्टरने शेती मशागत आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही आणि बैलांना पोसणेदेखील जमत नाही. अशा स्थितीत वाशिम तालुक्यातील भाऊराव धनगर नामक शेतकऱ्याने चक्क राजा आणि तुळशा अशी नावे असलेल्या दोन प्रशिक्षित घोड्यांना औताला जुंपून शेत मशागत आरंभली आहे.
विशेष म्हणजे घोड्यावर बसून शेतात ये-जा करणे, थोड्याथोडक्या शेतीपयोगी साहित्यांची घोड्यावरच ने-आण करणे शक्य असल्याने कामे सुसह्य झाली आहेत, असा अनुभव शेतकरी भाऊराव धनगर यांनी सांगितला.
गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात ये-जा करण्यासाठी घोड्यांचा वापर केला जातो. दोन्ही घोड्यांना शेती मशागतीसंबंधीचे प्रशिक्षण देण्यात आले असून ट्रॅक्टर किंवा बैलांऐवजी शेतकरी भाऊराव धनगर यांनी आपल्या घोड्यांव्दारेच शेती मशागतीचे काम सुरू केले. ते गतीने पूर्ण होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
अन् वरातीमध्ये घोडे नाचलेच नाहीत...
लग्नाच्या वरातीमध्ये घोडे नाचविण्यातून काही प्रमाणात आर्थिक मिळकत होऊ शकते. या उद्देशाने धनगर यांनी दोन्ही घोड्यांना तसे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला; मात्र घोडे काही नाचले नाही. शेवटी त्यांनी शेती मशागतीच्या कामासाठी घोड्यांचा वापर करणे सुरू केले असून त्यात ते पूर्णत: यशस्वी झाले आहेत.
मुलाच्या हट्टापायी घेतले होते घोडे
भाऊरावांनी मुलाच्या हट्टापायी काही वर्षांपूर्वी एक लहानसा घोडा खरेदी केला होता. कालांतराने तो मोठा झाला, त्याच्या जोडीला आणखी एक घोडा असावा म्हणून त्यांनी दुसरा एक घोडा खरेदी केला. या दोघांची नावे राजा आणि तुळशा अशी ठेवण्यात आली.