खरेदीदारांकडून शेतकरी वेठीला
By Admin | Published: July 18, 2016 01:19 AM2016-07-18T01:19:09+5:302016-07-18T01:19:26+5:30
शासनाच्या अडत धोरणाबाबत खरेदीदारांनी अचानक खरेदी बंदची भूमिका घेतल्याने रविवारी शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत.
पुणे : शासनाच्या अडत धोरणाबाबत खरेदीदारांनी अचानक खरेदी बंदची भूमिका घेतल्याने रविवारी शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. खरेदी बंदमुळे मार्केट यार्डात शेतीमाल मोठ्या प्रमाणावर शिल्लक राहिला. परिणामी, शेतकऱ्यांना कोथिंबीर, पालक, मेथीची जुडी चक्क एक रुपयाने दराने विकावी लागली. कष्टाने पिकविलेला माल कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने शेतकरी निराश झाले. खरेदीदारांच्या आडमुठ्या धोरणामुळे वेठीला धरल्या गेलेल्या काही शेतकऱ्यांना शेतीमाल फेकून देऊन घरी परतावे लागले.
मार्केट यार्डात रविवारी सुमारे २२५ ट्रक मालाची आवक झाली. मात्र, ऐन खरेदीच्या वेळी खरेदीदारांनी सामूहिकरीत्या माल खरेदी करण्यास नकार दिल्याने बाजारात एकच गोंधळ उडाला. बाजार समिती प्रशासन आणि अडत्यांनी प्रयत्न करूनही खरेदीदार शेतीमाल खरेदीसाठी तयार झाले नाहीत. परिणामी, रविवारी बाजार ठप्प झाल्याचे दिसून आले. बाजारात काही काळ तणावाचे वातावरण होते. त्यामुळे पोलिसांना पाचारण केले. परंतु, गोंधळामुळे बराच उशीर झाल्याने पालेभाज्या व फळभाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात घसरले.
खरेदीदारांचा बहिष्कार आणि पावसाची हजेरी यामुळे पालेभाज्यांचे मोठे नुकसान झाले. सर्वसाधारणपणे ८ ते १० रुपयांना विकली जाणारी पालेभाज्यांची गड्डी रविवारी एक ते दोन रुपये दराने विकली गेली. शेतकऱ्यांचे गाडीचे भाडेही सुटले नाही. काही शेतकऱ्यांनी कंटाळून जाग्यावरच माल सोडून दिला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे म्हणाले, ‘‘खरेदीदारांकडून बंद पुकारला जाणार असल्याचे रात्री उशिरा समजल्यानंतर काही खरेदीदारांबरोबर चर्चा केली होती. खरेदीदारांची कोणती संघटना नसल्यामुळे अचानक पुकारलेल्या बंदला सामोरे जावे लागले. खरेदी बंद झाल्याने माल शिल्लक राहिला. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आम्ही आढावा घेऊन शिल्लक राहिलेला माल शहरात विकण्याबाबत प्रयत्न करीत आहोत. काही शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात सोडून जावा लागला. हे खरे असले तरी अशा शेतकऱ्यांची संख्या थोडी आहे. यापुढे खरेदीदारांनी बंद पुकारल्यास पर्यायी व्यवस्थेचा विचार सुरू आहे. अधिकाऱ्यांशी बोलून आठवडे बाजाराच्या आरक्षित जागांवर शेतीमाल विक्री केली जाणार आहे.
>शेतीमालाचे दर घसरले
बाजार समिती प्रशासनाने बैठक घेऊन खरेदीदार व शेतकऱ्यांची भूमिका ऐकून घेतली. मात्र, या सर्व गोंधळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मागणीअभावी काही फळभाज्यांचे दर निम्म्याने, तर काहींचे दर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत खाली घसरले. त्यामुळे बाजारात माल शिल्लक राहिला.