काय सांगू...अतिवृष्टीने पिकांसह मुलालाही हिरावले! तोंडात वीजेची तार पकडून शेतकऱ्याची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 09:00 AM2022-08-21T09:00:40+5:302022-08-21T09:02:29+5:30
सहा व्यक्तीचे आमचे संयुक्त कुटुंब... गणेश कर्ता होता... साठी पार केल्याने आम्ही बुडा-बुडी थकलेलो... शेती करून गणेश पत्नी, दोन लेकरांसह आमचेही पालन-पोषण करायचा...
विनोद घोडे
चिकणी (जामणी)/वर्धा :
सहा व्यक्तीचे आमचे संयुक्त कुटुंब... गणेश कर्ता होता... साठी पार केल्याने आम्ही बुडा-बुडी थकलेलो... शेती करून गणेश पत्नी, दोन लेकरांसह आमचेही पालन-पोषण करायचा... पण अतिवृष्टीमुळे पीक खरडून गेले... शेतीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी या विवंचनेत असलेल्या लेकराने टोकाचे पाऊल उचलले... काय सांगू आता... अतिवृष्टीने पिकांसह माझ्या मुलालाही हिरावले, अशी व्यथा अश्रू अनावर झालेले गणेशचे वडील श्रावण माडेकर यांनी ‘लोकमत’कडे मांडली. तोंडात जिवंत वीज तार पकडून गणेशने जीवन संपविले.
जून महिन्यात शेतात लागवड केली. वेळीच पीक अंकुरल्याने यंदा समाधानकारक उत्पन्न होईल अशी आशा होती; पण अतिवृष्टीमुळे भदाडी नदीला पूर आला. याच पुरात संपूर्ण पीक खरडून गेले. त्यामुळे काही दिवसांपासून गणेश हा विवंचनेत होता. विविध राजकीय पक्षांच्या बड्या लोकप्रतिनिधींसह काही अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शेत पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्याने वेळीच शासकीय मदत मिळेल अशी आशा गणेशला होती, तसा तो नेहमी बोलायचाही. त्या तणावातच त्याने आत्महत्या केल्याने कुटुंबाचा आधारस्तंभ गेल्याने दु:खाचा डोंगर कोसळल्याचे माडेकर कुटुंबीयांनी सांगितले.
मुलगी पहिलीत, तर मुलगा तिसरीत
गणेश माडेकर याला दोन अपत्ये आहेत. आठ वर्षांचा मुलगा तेजस तिसरीचे, तर सहा वर्षांची मुलगी प्राजक्ता पढेगावातीलच शाळेत पहिलीचे शिक्षण घेत आहे. घटनेनंतर गणेशच्या पत्नीची प्रकृती बिघडल्याने तिला देवळी येथील रुग्णालयात नेण्यात आले होते.