कलिंगडाच्या पिकात शेतकरी टाकतोय उसाचे चिपाड, त्यावर शिंपडतोय गुळाचे पाणी; कशासाठी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 15:25 IST2025-02-21T15:24:50+5:302025-02-21T15:25:09+5:30
Watermelon Farming Tips: शेतकऱ्याने लढविली शक्कल. कलिंगड या पिकाचे उत्पादन हे तीन महिन्यांत मिळते. त्यामुळे कमी वेळात जास्त उत्पन्न देणारे पीक आहे.

कलिंगडाच्या पिकात शेतकरी टाकतोय उसाचे चिपाड, त्यावर शिंपडतोय गुळाचे पाणी; कशासाठी...
उन्हाळ्याचे दिवस येऊ घातले आहेत. बाजारात कलिंगड दिसू लागले आहेत. अद्याप उकाड्याला वेळ असला तरी तुम्हाला नैसर्गिक थंडावा देण्यासाठी शेतकरी कष्ट करत आहेत. अनेक एकरांमध्ये गावोगावी कलिंगडाची लागवड करण्यात येत आहे. लागवडीनंतर दोन-तीन महिन्यांतच फळे धरू लागतात. ती बाजारात येतात. लाल, रसाळ पाणी असलेली फळे लोक घेतात आणि उकाड्यात आपली तहान भागवतात. शेतकऱ्याला कमी वेळेत चांगले पैसे मिळतात. यासाठी उत्पादनही चांगले यावे लागते. म्हणून एका शेतकऱ्याने शक्कल लढविली आहे.
पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा बु. येथील प्रगतिशील शेतकरी वसंत पाटील यांनी आपल्या सव्वा एकर शेत जमिनीत कलिंगडाचे पीक लागवड केली आहे. आता या वेलींना फुले येई लागली आहेत. येत्या दीड-दोन महिन्यांत त्यांचे पिक बाजारात जाईल. परंतू, चांगले पीक येण्यासाठी त्यांनी एक शकक्ल लढविली आहे.
कलिंगडाच्या रोपांना फुले येऊ लागली आहेत. आता त्यांचा परागीकरणाचा काळ सुरु झाला आहे. फुलपाखरे, मधमाशा तिथे रुंजी घालणार आहेत. या फुलांचे चांगले परागीकरण होण्यासाठी व जास्त पीक येण्यासाठी पाटील यांनी शेतात ठिकठिकाणी रसवंती गृहातून टाकलेले उसाचे चिपाड आणून टाकले आहे. तसेच त्यावर गुळाचे पाणी शिंपडत आहेत.
असे केल्याने काय होते...
असे केल्याने गुळाच्या पाण्याच्या वासाला मधमाशी आकर्षित होते व या भागात येते. यामुळे शेतात परागीकरण होण्यास मदत होते. परागीकरण चांगले झाले तर फळधारणादेखील चांगली आणि मोठ्या प्रमाणावर होते. याचा उत्पादनावर परिणाम होतो व चांगले उत्पन्न मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
इतर शेतकऱ्यांनीही करावे का...
पाटील यांना या गोष्टीचा अनुभव आला आहे. यामुळे त्यांनी इतर शेतकऱ्यांनाही हा प्रयोग करून पहावा. यासाठी जास्त खर्च नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.