शेतकऱ्याने बँकेतच पेटवून घेतले
By admin | Published: June 5, 2016 12:55 AM2016-06-05T00:55:18+5:302016-06-05T00:55:18+5:30
वसुलीच्या तगाद्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने बँक व्यवस्थापकाच्या कक्षातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने पुढील प्रसंग टळला.
यवतमाळ : वसुलीच्या तगाद्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने बँक व्यवस्थापकाच्या कक्षातच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा
प्रयत्न केला. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने पुढील प्रसंग टळला. हा प्रकार शनिवारी दुपारी साडेबारा वाजता येथील वाशिम
अर्बन बँकेच्या शाखेत घडला.
अर्चित मानेकर असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
स्थानिक माळीपुरा भागातील गणपती मंदिर चौकातील रहिवासी असलेल्या अर्चित मानेकरची डोर्ली शिवारात शेती आहे. यावर त्याने तीन वर्षांपूर्वी वाशिम अर्बन बँकेच्या यवतमाळ शाखेतून दोन लाख रुपये कर्ज उचलले. या कर्जाची परतफेड तो करू शकला नाही. परिणामी, व्याजासह तीन लाख रुपये कर्ज झाले. या थकबाकीसाठी बँकेने अर्चितला नोटीस पाठविली. वारंवार पाठपुरावा करण्यात आला. या तगाद्यामुळे त्रस्त होऊन त्याने हा प्रकार केल्याचे पोलिसांनी सांगितले.
दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
बँकांकडून कर्जाच्या परतफेडीसाठी लावल्या जात असलेल्या तगाद्यामुळे जिल्ह्यात दोन शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. खुशाल बापूराव चव्हाण (३४ रा. कामठवाडा ता. यवतमाळ) आणि अर्जुन शामराव कराळ (रा. कापरा) अशी त्यांची नावे आहेत.
कामठवाडा येथील खुशाल बापूराव चव्हाण या शेतकऱ्याला बँकेने कर्ज नाकारल्याने त्याने शुक्रवारी सकाळी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. त्याच्यामागे आई, पत्नी, मुलगा व मोठा आप्त
परिवार आहे. अर्जुन कराळ याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. त्याच्याकडे चार एकर शेती आहे. त्या शेतीवर ग्रामीण बँकेच्या सावर शाखेचे ४० हजार रुपये कर्ज आहे. बँकेने पुनर्गठनास नकार दिल्यामुळे तो चिंतेत होता, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. (वार्ताहर)