जलसंधारण कार्यालयात शेतकरी महिलेने स्वत:ला पाच तास घेतलं डांबून
By Admin | Published: August 30, 2016 06:34 PM2016-08-30T18:34:29+5:302016-08-30T18:34:29+5:30
एका शेतकरी महिलेने मंगळवारी आपल्या बहिणीसह स्वत:ला येथील लघू सिंचन विभागाच्या कार्यालयात तब्बल पाच तास डांबून घेतले
ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. 30 - साठवण तलावासाठी अधिग्रहण केलेल्या शेतीचा वाढीव मोबदला देण्यासाठी लघू सिंचन विभाग टाळाटाळ करीत असल्याने त्रस्त एका शेतकरी महिलेने मंगळवारी आपल्या बहिणीसह स्वत:ला येथील लघू सिंचन विभागाच्या कार्यालयात तब्बल पाच तास डांबून घेतले. या घटनेने जिल्हा प्रशासन चांगलेच हादरले. पाच तासांच्या कसरतीअंती सदर शेतकरी महिलेला बाहेर काढण्यात यश आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.
प्राप्त माहितीनुसार, देवळी तालुक्यातील हिवरा येथील उमाकांता भानू राऊत व त्यांची बहिण सुनंदा वासनिक यांच्या मालकीच्या सुमारे ९ एकर शेतीचे साठवण तलावासाठी लघू सिंचन (जलसंधारण) विभागाच्यावतीने अधिग्रहण करण्यात आले. त्यावेळी त्यांना मोबदल्यापोटी १ लाख ३६ हजार रुपये मिळाले. दरम्यानच्या काळात निम्म्या म्हणजेच ४.५० एकर शेतीचा वाढीव मोबदला उमाकांता राऊत यांची बहीण सुनंदा यांना मिळाला. उमाकांता राऊत यांनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला. यानुसार २०१२ पर्यंत ७ लाख ४५ हजार ६१४ रुपये आणि २०१६पर्यंत त्यावरील व्याज, अशी सुमारे १३ लाखांपेक्षा अधिक रक्कम मोबदला म्हणून उमाकांता राऊत यांना लघू सिंचन विभागाकडून मिळणे अपेक्षित होते. याबाबत राऊत यांनी वारंवार पाठपुरावा केला. मात्र उपयोग झाला नाही. अखेर आज सकाळी ११.३० वाजता उमाकांता राऊत यांनी भगीणी सुनंदा वासनिक यांच्यासह वर्धा येथील लघू सिंचन विभागाचे कार्यालय गाठले. आणि आपल्या सुनंदासह स्वत:ला कार्यालयात डांबून घेतले. या घटनेने सदर विभाग चांगलाच हादरला. दोघींची सुटका करण्यासाठी स्थानिक पातळीवर त्यांची समजूत घालण्याचा पूरेपूर प्रयत्न झाला. मात्र उमाकांता मोबदल्याच्या मागणीवर ठाम होत्या.
तब्बल ४.३० वाजतापर्यंत संबंधित अधिकारी उमाकांता यांना समजविण्याचा प्रयत्न करीत होते. अखेर रक्कम मिळवून देण्याची ग्वाही देताच त्यांनी आपली सुटका केली. यानंतर सदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. दोघी बहिणींना जिल्हाधिकारी कार्यालयात नेले असता निवास उपजिल्हाधिकारी जोशी यांनी याबाबत त्यांची नागपूर येथील लघू सिंचन विभागाचे कार्यकारी अधिकारी अभियंता यांच्याशी चर्चा घडवून आणली. तेव्हा येत्या पंधरवड्यात वाढीव मोबदला मिळून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यानंतर शहर पोलिसांनी दोन्ही भगिणींना शहर ठाण्यात नेले. त्यांच्यावर शासकीय कामात व्यत्यय आणल्याप्रकरणी कारवार्ई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.