महाराष्ट्रात उद्या शेतकरी संघटनेचे आंदोलन; अखिल भारतीय किसान संघर्ष समिती आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2020 03:47 AM2020-12-02T03:47:27+5:302020-12-02T07:26:56+5:30
अजित नवले; ऑनलाईन बैठकीत निर्णय, जनसंघटनांची समन्वय समितीची ऑनलाईन बैठक विश्वास उटगी यांच्या पुढाकाराने मंगळवारी पार पडली.
अकोले (जि. अहमदनगर) : केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आल्याचे किसान सभेचे प्रमुख डॉ. अजित नवले यांनी सांगितले.
जनसंघटनांची समन्वय समितीची ऑनलाईन बैठक विश्वास उटगी यांच्या पुढाकाराने मंगळवारी पार पडली. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन केंद्र सरकार बळाच्या जोरावर दडपून टाकू पाहत आहे. शेतकऱ्यांचे हे आंदोलन सर्व राज्यांमध्ये आणखी तीव्र करण्याची हाक अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिली आहे. त्याला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांना बरोबर घेत ३ डिसेंबरला महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रास्ता रोको करून शेतकऱ्यांचे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.