केंद्रीय पथकावर शेतकऱ्यांचा संताप

By Admin | Published: August 12, 2015 02:49 AM2015-08-12T02:49:47+5:302015-08-12T02:49:47+5:30

मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर निघालेल्या केंद्रीय पथकाला मंगळवारी शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. पाहणीचा फार्स नको, काय मदत करणार

Farmers' anger in the central squad | केंद्रीय पथकावर शेतकऱ्यांचा संताप

केंद्रीय पथकावर शेतकऱ्यांचा संताप

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर निघालेल्या केंद्रीय पथकाला मंगळवारी शेतकऱ्यांच्या संतापाला सामोरे जावे लागले. पाहणीचा फार्स नको, काय मदत करणार ते सांगा हा सवाल प्रत्येक ठिकाणी उपस्थित करण्यात आला.
बीड जिल्ह्यातीस चौसाळा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील रहाटगाव येथे तर शेतकऱ्यांनी गाड्यांचा ताफा अडवून अधिकाऱ्यांना दुष्काळाची तीव्रता समजावून सांगितली.
यंदा मराठवाड्यात पावसाने पाठ फिरविल्याने खरीप पीक हातून गेले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्रसिंह आणि केंद्रीय फलोत्पादन महामंडळाचे कार्यकारी संचालक ए. के. सिंह, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांच्यासह संबंधित ठिकाणचे जिल्हाधिकारी, इतर अधिकाऱ्यांच्या पथकाने मंगळवारी औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील काही गावांची पाहणी केली.
रहाटगाव येथील शेतकरी आयुक्तांच्या गाडीला आडवे आले. त्यामुळे राघवेंद्रसिंह, डॉ. दांगट यांना खाली उतरावे लागले. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी आणि अन्नदाता शेतकरी संघटनेचे प्रमुख जयाजी सूर्यवंशी यांनी त्यांना मागण्यांचे निवेदन दिले.
जालना जिल्ह्यात पथकाने शेततळे आणि पाण्याअभावी सुकलेल्या पिकांची पाहणी केली. दौऱ्यास विलंब झाल्याने पथकाने वाहनातूनच संत्र्यांच्या बागेचे निरीक्षण केले. बीड जिल्ह्यातील पाडळशिंगी येथे तब्बल दोन तास उशिरा दुपारी दीड वाजता हे पथक पोहचले. मादळमोही शिवाराजवळ काही मिनिटांची पाहणी करून ताफा पुढे निघाला. मादळमोहीच्या एका शेतकऱ्याने ताफा अडवत रस्त्यातील शेताची पाहणी करून साहेब तुम्हाला दुष्काळ काय समजणार ?, जरा आमच्यासोबत चला, म्हणजे आमचा जीव कसा झुरतोय, ते समजेल तुम्हाला, असे सुनावले. पुढे चौसाळ्यातही ताफा अडवून शेतकऱ्यांनी घेराव घातला. त्यांचे आठ-दहा मिनिटे गाऱ्हाणे एकेल्यानंतर ताफा पुढे उस्मानाबादसाठी रवाना झाला. उस्मानाबादमध्ये इंदापूर फाट्याजवळ जळालेल्या शेवग्याच्या बागेची पथकाने पाहणी केली. संध्याकाळी सारोळामार्गे पथक लातूरला रवाना झाले. (प्रतिनिधी)

केंद्र व राज्य शासनाकडे पाहणीचा अहवाल सादर करण्यात येईल. मी बारकाईने काही घटकांचे मूल्यांकन केले आहे. परिस्थिती गंभीर असल्याचे दिसून आले आहे. शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे. शासनापर्यंत शेतकऱ्यांच्या भावना पोहोचविण्यात येतील. त्यानंतर शासन निर्णय घेईल.
- राघवेंद्रसिंह, अतिरिक्त आयुक्त,
केंद्रीय दुष्काळ निवारण विभाग

Web Title: Farmers' anger in the central squad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.