शेतकऱ्यांना लुटणाऱ्या टोळीस अटक
By admin | Published: June 19, 2016 09:38 PM2016-06-19T21:38:24+5:302016-06-19T21:39:10+5:30
कांदा विक्री करून परतणाऱ्या शेतकऱ्यांना नांदगाव, मनमाड परिसरात अडवून लुटणाऱ्या टोळीचा ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 19 - कांदा विक्री करून परतणाऱ्या शेतकऱ्यांना नांदगाव, मनमाड परिसरात अडवून लुटणाऱ्या टोळीचा ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या टोळीतील बंडू गोरख जाधव (२५, रा. विटावे रोड वस्ती, साळसाणे, ता. चांदवड), रवि शिवाजी माळी (२०, रा. साळसाणे, ता. चांदवड) व सोनु भाऊसाहेब शिंदे (२३, रेडगावरोड, सळसाणे, ता. चांदवड) अशा तिघांना अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीत नांदगाव, मनमाड, येवला या भागातून मोठ्या प्रमाणत शेतकरी कांदा तसेच आला शेतीमाल विक्रीसाठी येत असतात. परंतु काही महिन्यांपासून मालाची विक्री करून परतणाऱ्या शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर तसेच वाहने अडवून त्यांना मारहाण करत लूट केली जात असल्याच्या घटना वाढल्या होत्या.
जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने साळसाने परिसरात सापळा रचून या तिघांना ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक मच्छिंद्र रणमाळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शिलावट, अरुण पगारे, रवी वानखेडे, राजेंद्र पाटील, दीपक अहिरे, बंडू ठाकरे, भरत कांदळकर, संदीप हांडगे, दिलीव घुगे, किरण काकड, विश्वनाथ काकड, गणेश नरोटे, बिहरम यांनी ही कामगिरी पार पाडली.