'लबाड' सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक: अनिल बोंडे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 04:40 PM2020-02-16T16:40:51+5:302020-02-16T16:48:04+5:30
ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत होता, अशा योजना बंद करण्याचा या सरकारने धडाकाचं लावला असल्याचे बोंडे म्हणाले.
मुंबई : विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांचा महाविकास आघाडीच्या सरकाराला विसर पडला असून ह्या लबाड सरकारकडून रोज शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे. नवी मुंबईत आयोजित भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश राज्य परिषदेत ते बोलत होते.
भाजप सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्महत्याग्रस्त तालुका, नक्षलग्रस्त जिल्हा आणि कायम दुष्काळी तालुक्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना सुरु केली होती आणि त्यासाठी 80 टक्के अनुदान देण्यात आले होते. मात्र आता या सरकारने त्याची सबसिडी थांबवून ठेवली आहे. तर ज्या योजनांचा शेतकऱ्यांना फायदा होत होता, अशा योजना बंद करण्याचा या सरकारने धडाकाचं लावला असल्याचे बोंडे म्हणाले.
तर फडणवीस यांनी केलेल्या कर्जमाफीला शिवसेनेचा,कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केला होता. मात्र आता त्यांनी केलेल्या कर्जमाफी योजनेत मध्यम मुदती कर्ज घेतले गेलं नाही. कर्ज माफीची यादी समोर आल्यावर हे सगळ स्पष्ट होणार आहे. अवकाळी पाऊस झाल्यावर 25 हजारांची मागणी करणारे हेच लोकं आता सत्तेत आल्यावर ती मदत देण्याचे विसरले. शेतकऱ्यांना चिंता मुक्त करू म्हणणारे आता त्यांना चिंतेत टाकत असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला.