शेतकरी अडचणीत : शेतीकामाला आणण्यासाठी शेतकऱ्यांना करावी लागते भाडयाची गाडी
By admin | Published: October 20, 2016 05:29 PM2016-10-20T17:29:49+5:302016-10-20T17:29:49+5:30
परिसरात शेतात उभी पिके काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. २० : परिसरात शेतात उभी पिके काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जादा पैसे देऊनही मजूर काम करण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा या परिसरातील खरिप हंगाम पावसाअभावी ६० ते ७० टक्के वाया गेला. हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस होणार, असे भाकीत केले होते. मात्र, अपेक्षित पाऊस झाला नाही.
जेमतेम जगविली पिके
पाऊस समाधानकारक न झाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी जेमतेम पिके जगविली. काहींनी बाहेरून पाण्याचे टॅँकर आणून सिंचनाद्वारे पिकांना पाणी दिले. मात्र, आता जी पिके चांगल्या स्थितीत आहे, ती कापण्यासाठी मजूर मिळत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांची दमछाक
खरीप शेती हंगाम हंगाम आवरण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. ज्वारी, बाजरी, सोयाबीन, तीळ, कापूस या पिकांची तोडणी, बांधणी व कापणीचे काम शेतकऱ्यांना स्वत: करावे लागत असल्यामुळे त्यांची दमछाक होताना दिसत आहेत. सद्य:स्थितीत बागायत व कोरडवाहू जमिनीचा हंगाम आवरण्यास एकाच वेळेस सुरुवात झाली आहे. तसेच याचवेळी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या देखील प्रथम सत्राची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुुळे मुलांनी शेती कामाकडे पाठ फिरविली आहे. या सर्व कारणामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे.
दिवसाचे दोनशे रुपये
त्यात आता महागाई वाढल्यामुळे मजुरांनी त्यांच्या मजुरीतही वाढ केली आहे. सकाळच्या सत्रात काम केले तर शेतकऱ्यांना मजुराला दीडशे रुपये द्यावे लागतात व सकाळ व दुपारच्या सत्रात शेतकऱ्यांनी काम केले तर दिवसाचे २०० रुपये द्यावे लागतात. त्यात शेतकऱ्यांना उत्पादित केलेला माल मार्केटपर्यंत आणण्यासाठी मोठा खर्च लागत असल्यामुळे जादा मजुरी देणे मजुरांना शक्य होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीस आलेला दिसत आहे.