सरसकट कर्जमाफी कधी मिळणार, बांधावर गेलेल्या शिवसेना नेत्यांना शेतकऱ्यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 11:04 AM2019-11-03T11:04:41+5:302019-11-03T11:13:04+5:30
आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते.
मुंबई : सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी शिवसेनेला निवडून द्या असे विधान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या भाषणातून अनेकदा केला होता. त्यामुळे राज्यात ५६ आमदार निवडून देणारे मतदार आता शिवसेनेला सरसकट कर्जमाफीवरून जाब विचारत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेला निवडून दिल्यानंतरही कर्जमाफी का नाही ? असा सवाल परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना शेतकऱ्यांनी केला. रावते हे शनिवारी पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या युवसेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेतून सरसकट कर्जमाफीवरून शिवसेनेने रान उठवले होते. आदित्य यांनी आपल्या अनेक सभेतून राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली होती. त्यांनतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत सुद्धा वेळोवेळी शिवसेनेकडून सरसकट कर्जमाफीचा मुद्दा समोर करण्यात आला होता. तर घोटी येथे झालेल्या जाहीर सभेत जनतेसमोर शिवसेनेची भुमिका मांडताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, शिवसेनेला निवडून दिल्यास सरसकट कर्जमाफी आणि सातबारा कोरा करू.
त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची आठवण शेतकरी शिवसेनेला करून देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेनेचे मंत्री आणि नेते राज्यभर दौरे करत आहे. त्याचप्रमाणे परिवहन मंत्री दिवाकर रावते हे शनिवारी अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. पाहणी साठी आलेल्या रावते यांना मात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफीची आठवण करून देत जाब विचारला. शिवसेनेला निवडून दिल्यानंतरही कर्जमाफी का नाही असा सवाल शेतकऱ्यांनी रावते यांना केला.त्यानंतर रावते यांनी संबंधीत शेतकऱ्याच्या कर्जमाफीची संपूर्ण माहिती पाठवण्याचे सूचना स्थानिक नेत्यांना केल्या.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासन शिवसेना पूर्ण करणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अजूनही राज्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे खुद्द आदित्य ठाकरे यांनी आपल्या सभेतून सांगितले होते. त्यामुळे सत्तास्थापनेनंतर येणारी नवीन सरकार सरसकट कर्जमाफीबद्दल काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.