वसंतदादा कारखान्यावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल
By admin | Published: July 26, 2016 12:55 AM2016-07-26T00:55:53+5:302016-07-26T00:55:53+5:30
वसंतदादा कारखान्याची २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षातील उसाची बिले थकीत असल्याने व दिलेले धनादेश न वठल्याने सोमवारी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखान्यावर हल्लाबोल केला
सांगली : वसंतदादा कारखान्याची २०१३-१४ व २०१४-१५ या वर्षातील उसाची बिले थकीत असल्याने व दिलेले धनादेश न वठल्याने सोमवारी कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कारखान्यावर हल्लाबोल केला. खिडक्यांच्या काचा फोडून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. कारखान्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत दिवसभर ठिय्या मारला. पुढील सोमवारच्या तारखेचा धनादेश कारखाना प्रशासनाने दिल्याने आंदोलन शांत झाले.
वसंतदादा कारखान्याच्या थकीत ऊसबिलाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गाजत आहे. कार्यक्षेत्रातील शेतकरी आक्रमक होऊ लागल्यानंतर कारखाना प्रशासनाने त्यांना धनादेश दिले होते. परंतु ते न वठल्याने संतप्त झालेल्या शेतकरी कारखान्यावर एकत्र आले. कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काहींनी खिडक्यांच्या काचा फोडल्या. त्याचवेळी पोलिस दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. कारखाना प्रशासनाचा धिक्कार करीत जोरदार निदर्शने करण्यात आली. बिले मिळाल्याशिवाय कारखान्यावरून जाणार नाही, अशी भूमिका सर्व शेतकऱ्यांनी घेतली. शेकडो शेतकऱ्यांनी कार्यालयाला गराडा घातल्याने प्रशासनाची कोंडी झाली.
थकीत बिलाच्या प्रश्नावर कारखान्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शेवटी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी काही शेतकऱ्यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. पाटील यांनी पुढील आठवड्याचा धनादेश देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार कारखान्याचे मुख्य लेखापाल व्ही. एस. सरनोबत यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. १ आॅगस्टचे धनादेश लिहून दिल्यानंतर शेतकरी शांत झाले. (प्रतिनिधी)
शेतकरी संतप्त
कारखाना कार्यस्थळावर सुमारे सव्वाशे शेतकऱ्यांनी दिवसभर ठिय्या मांडला होता. शेतकरी संतप्त झाल्याने मोठा पोलिस बंदोबस्त तेथे तैनात करण्यात आला होता.
थकबाकीबाबत गोंधळ
कारखान्याची २0१३-१४, २0१४-१५ या हंगामातील नेमकी किती थकबाकी आहे, याबाबत संभ्रमावस्था आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनुसार, सुमारे १३ कोटींची थकबाकी आहे, तर आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या माहितीनुसार, २५ कोटी आहे.