शेतक-यांनी पेटवली कांदा आणि कापसाची होळी!
By admin | Published: March 24, 2016 02:05 AM2016-03-24T02:05:12+5:302016-03-24T02:05:12+5:30
कांद्याचे भाव गडगडल्यामुळे व्यथीत शेतक-यांनी कांद्याची तर कापूस उत्पादक शेतक-यांनी कापसाची होळी पेटवली.
संग्रामपूर/खामगाव (जि. बुलडाणा) : कांद्याचे भाव गडगडल्यामुळे व्यथीत झालेल्या संग्रामपूरातील कांदा उत्पादक शेतकर्यांनी कांद्याची तर दुष्काळी मदतीमधून कापूस उत्पादकांना वगळल्याच्या निषेधार्थ खामगाव तालुक्यात कापूस उत्पादक शेतकर्यांनी कापसाची होळी पेटवली. यावेळी संतप्त शेतकर्यांनी सरकारच्या नावाने बोंबही ठोकली.
कांदो व्यापार्याकडून सद्या प्रति क्विंटल ३५0 ते ४00 रुपये दर दिला जात असून शेतकर्यांची अडवणूक केली जात आहे. कांदा उत्पादकाच्या व्यथेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विजय वानखडे, नारायण तायडे, लक्ष्मण घाटे, जनार्दन म्हसाळ, सुनील वानखडे, बाबुराव वानखडे, स्वाती तायडे, सुरज तायडे, रामदास तायडे, गणेश कुले आदी शेतकर्यांनी कांद्याची होळी करुन एकमेकांना रंग न लावता कांदे मारुन होळी साजरी केली . खामगाव तालुक्यातील पारखेड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांच्या नेतृत्त्वात कापसाची होळी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी दुष्काळत होरपळत आहे. कापूस उत्पादकांना दिलासा देण्याऐवजी राज्य शासनाने दुष्काळी मदतीतून कापूस उत्पादकांना वगळले आहे. शासनाच्या या धोरणाच निषेध करण्यासाठी शेतकर्यांनी कापसाची होळी पेटवली. यावेळी विदर्भातील कापूस उत्पादकांना दुष्काळी मदत द्यावी, कापसाला भाववाढ देण्यात यावी, अशी मागणी करत शासनाच्या धोरणाविरोधात नारे व बोंब ठोकण्यात आली.