शेतकरी कर्जमुक्तीसाठी जमीन विक्रीला

By admin | Published: April 3, 2017 06:41 AM2017-04-03T06:41:52+5:302017-04-03T06:41:52+5:30

सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी गरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वत:च्या मालकीची बागायती शेती विकायला काढली

Farmers can sell land for debt relief | शेतकरी कर्जमुक्तीसाठी जमीन विक्रीला

शेतकरी कर्जमुक्तीसाठी जमीन विक्रीला

Next

नंदकिशोर पाटील,
मुंबई- आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांची भाऊगर्दी अवतीभोवती असताना, उस्मानाबाद जिल्ह्यातील कवठा (ता. उमरगा) येथील सधन शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते विनायकराव पाटील यांनी गरीब शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी स्वत:च्या मालकीची बागायती शेती विकायला काढली आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चळवळीत सक्रिय असलेले विनायकराव पाटील यांची कवठा (ता. उमरगा) येथे बारमाही पाण्याखालची शेतजमीन आहे. त्यापैकी तेरणा नदीकाठावरील लातूर-उमरगा राज्यमार्गालगत असलेली दहा एकर शेती त्यांनी विक्रीला काढली आहे. याबाबत वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत म्हटले आहे की, सदर जमीन विक्रीतून आलेल्या पैशांमधून आत्महत्याग्रस्त उस्मानाबाद व यवतमाळ जिल्ह्यातील काही गावे दत्तक घेऊन, तेथील गरीब थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जफेड करून त्यांचा सातबारा कोरा करण्यात येणार आहे.
सामाजिक बांधिलकीतून विनायकराव पाटील यांनी आजवर अनेकदा मदतीचा हात पुढे केलेला आहे. मराठवाड्यात दुष्काळ पडलेला असताना, त्यांनी मोफत छावणी उघडून पाच हजार मुक्या जीवांचा दोन वर्षे सांभाळ केला. गतवर्षी स्वत:च्या शेतामधून दररोज ५० लाख लीटर मोफत पाणीपुरवठा करून, त्यांनी लातूरकरांची तहान भागविली. दुष्काळग्रस्त गावातील ५० शेतकरी दत्तक घेऊन, त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बियाणे दिले आहे.
>भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनातही योगदान
१९९३ च्या भूकंपात उद्ध्वस्त झालेल्या किल्लारी, सास्तूर, कवठा आदी गावांच्या पुनर्वसन कार्यातही विनायकराव पाटील
यांचे योगदान राहिलेले आहे. या कार्याची दखल घेऊनच महाराष्ट्र सरकारने दत्तक घेतलेल्या गुजरातमधील भूजच्या पुनर्वसनाची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपविली होती. समाजाचे काही तरी देणे लागते, या भावनेतून मी हा निर्णय घेतला आहे. इतरांकडून अपेक्षा करण्यापेक्षा कोणीतरी स्वत:पासून सुरुवात करायला हवी होती.-विनायकराव पाटील
शेतीविक्रीची जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पाटील यांचा भ्रमणध्वनी सतत खणखणत आहे. जमीन विकत घेण्यासाठी नव्हे, तर या कार्यात योगदान देण्याची इच्छा व्यक्त करणारे असंख्य कॉल्स आल्याचे त्यांनी सांगितले. कवठा गावातील तरुणही पुढे सरसावले असून, गरीब शेतकऱ्यांना मदतीचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Farmers can sell land for debt relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.