शेतकरी आत्महत्यांवरून गदारोळ
By admin | Published: March 15, 2016 01:46 AM2016-03-15T01:46:12+5:302016-03-15T01:46:12+5:30
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना द्यायच्या मुद्द्यावरून सोमवारी मदत व पुर्नवसनमंत्री एकनाथ खडसे आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ व्हिसेराचा
मुंबई : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना द्यायच्या मुद्द्यावरून सोमवारी मदत व पुर्नवसनमंत्री एकनाथ खडसे आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. केवळ व्हिसेराचा अहवाल मिळाला नसल्याचे कारण देत, सरकारने पन्नास टक्के आत्महत्याग्रस्तांना मदत नाकारल्याचा आरोप विरोधकांनी केला, तर गेल्या दहा वर्षांतील तुमची पापे आम्ही फेडतोय. तुमच्या चुकीच्या धोरणांची फळे शेतकऱ्यांना भोगावी लागत असल्याचा पलटवार खडसे यांनी केला. या गदारोळात विधान परिषदेचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकुब करावे लागले.
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबाबतचा मुद्दा राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. तब्बल ४५ सदस्यांनी याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता.
यावर बोलताना खडसे म्हणाले की, ‘राज्यात गेल्या वर्षभरात ३ हजार ३२८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या असून, त्यापैकी १८४१ आत्महत्या शेती संकटामुळे झाली असल्याने, कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे. उर्वरित प्रकरणात व्हिसेरा अहवाल मिळाला नसल्याने, सदर प्रकरणे फेरतपासणीसाठी पाठविण्यात आली,’ असे खडसे यांनी सांगितले.
खडसे यांच्या उत्तराने विरोधकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी सुरूकेली. आत्महत्याग्रस्तांना मदत करण्यासाठी व्हिसेराचा अहवाल लागतोच कशाला, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. व्हिसेरा अहवालाचे कारण देत मदत नाकारणे ही दिशाभूल असल्याचा आरोप करत, विरोधक सभापतींसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले.
या घोषणाबाजीनंतर खडसे यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे तुम्ही दहा वर्षे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. तुम्ही केलेली पापे आम्ही फेडतोय, असे त्यांनी विरोधकांना सुनावले. (प्रतिनिधी)
आत्महत्येच्या प्रश्नावर ११ उपप्रश्न
तारांकित प्रश्नाला किती उपप्रश्न असावे, याबाबत काही नियम संकेत आहेत. मात्र, आत्महत्येच्या या प्रश्नावर तब्बल ११ उपप्रश्न विचारण्यात आले. विधिमंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असावी, असे सांगत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. यावर सभागृहातील तब्बल ४५ सदस्यांनी प्रश्न उपस्थित केल्याने, त्यांचे समाधान होणे महत्त्वाचे असल्याचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.