भूमी संपादनाकरिता शेतकऱ्यांची सहमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 04:14 AM2017-08-11T04:14:56+5:302017-08-11T04:15:10+5:30
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावात, रायगड किल्ला जतन संवर्धन आणि विकास योजनेकरिता आवश्यक १०० एकर जमिनीपैकी आपली ८८ एकर जमीन देण्यास पाचाडमधील शिवप्रेमी शेतकऱ्यांनी विनातक्रार सहमती दिली आहे.
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड गावात, रायगड किल्ला जतन संवर्धन आणि विकास योजनेकरिता आवश्यक १०० एकर जमिनीपैकी आपली ८८ एकर जमीन देण्यास पाचाडमधील शिवप्रेमी शेतकऱ्यांनी विनातक्रार सहमती दिली आहे.या जमिनीची सरकारी संयुक्त मोजणी पूर्ण झाल्याने, पाचाड येथे शिवसृष्टी, हेलिपॅड आणि पर्यटन सुविधा केंद्र उभारण्याच्या कामास आता प्रारंभ होवू शकेल, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. डॉ. विजय सूयर्वंर्श यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या रायगड किल्ला जतन संवर्धन व परिसर विकास आराखडा आढावा बैठक झाली.
देशभरातील ऐतिहासिक गड किल्ल्यांच्या संवर्धन व जतनासाठी ‘रोल मॉडेल’ म्हणून रायगड किल्ल्याचा विकास करण्याचा केंद्र शासनाचा मनोदय असल्याचे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या २४ डिसेंबर २०१६ रोजी सांगितले होते. प्राथमिक स्तरावर ५०० कोटी रुपये या योजनेला देण्याचे जाहीर केले होते. यासंदर्भात आराखडा ६०६ कोटी रुपयांचा झाला. त्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने मान्यता देवून निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार ६०६ कोटी रुपयांच्या या योजनेमधील विविध कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला. या बैठकीस रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे, रायगड किल्ला जतन व संवर्धन योजनेच्या विशेष स्थापत्य पथकाचे अधीक्षक अभियंता जी.एस.मोहिते, एमटीडीसीचे सल्लागार वास्तुविद्या विशारद राहुल समेळ आदी अधिकारी उपस्थित होते.
रायगड किल्ला जागतिक वारसा
घोषित करण्याचा प्रस्ताव
केंद्र शासनाने‘ब’श्रेणी दिलेला रायगड किल्ला ‘अ’श्रेणी स्मारक म्हणून घोषित व्हावा, याकरिता पर्यटन विभागाकडून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागास प्रस्ताव दिला जावा. तसेच किल्ल्यास ‘जागतिक वारसा स्मारक’ म्हणून घोषित करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावास भारतीय पुरातत्व विभागाने समर्थन द्यावे. पुरातत्व विभागाकडील एकूण पाच कामांच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्याबाबत पुरातत्व विभागाच्या अधिकाºयांना डॉ.सूर्यवंशी यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. केंद्र शासनाच्या विविध विभागांकडे व नवी दिल्लीच्या भारतीय पुरातत्व विभागाकडे पाठविलेल्या प्रस्तावांबाबत पाठपुरावा करण्याचे आदेश त्यांनी या बैठकीत दिले.
तीन दगडी मार्गिकांच्या कामास सप्टेंबरमध्ये प्रारंभ
रायगड किल्ल्यावरील तीन दगडी मार्गिकांच्या २१ कोटी रुपयांच्या कामास प्रशासकीय मान्यता मिळून ९ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार सप्टेंबर २०१७ मध्ये या कामास सुरु वात करण्यात येणार असल्याचे सूयर्वंशी यांनी सांगितले.