शेतकरी कर्जमाफी योजनेत आता व्यक्ती घटक मानणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 03:47 AM2018-07-21T03:47:01+5:302018-07-21T03:47:07+5:30
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जाहीर शेतकरी कर्जमाफीसाठी आता कुटुंब घटक न मानता व्यक्ती हा घटक मानण्यात येणार आहे.
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जाहीर शेतकरी कर्जमाफीसाठी आता कुटुंब घटक न मानता व्यक्ती हा घटक मानण्यात येणार आहे. आतापर्यंत प्रतिकुटुंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट होती, मात्र आता प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरीत्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी विधानपरिषदेत व विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
देशमुख म्हणाले, कुटुंबाची थकबाकीची एकूण रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांना दीड लाखावरील रक्कम आगाऊ भरल्यानंतर शासनातर्फे दीड लाख कर्जमाफीचा लाभ देण्याचा निकष होता. आता शासनाने अशा प्रकरणी कुटुंबाची अट शिथिल केली असून प्रत्येक कर्जदारास दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. यामुळे कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पती/पत्नी व मुले यांना प्रत्येकी दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने एकरकमी परतफेड योजनेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची भरावी लागणारी रक्कम कमी होणार आहे. यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकºयांना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
>योजनेबाबत बँका सकारात्मक नाहीत
यापूर्वी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी कर्जमाफी योजनेसंदर्भात बँकांची भूमिका सकारात्मक नसल्याचे स्पष्ट केले. प्रकाश आबीटकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. यादरम्यान अजित पवार यांनी सांगितले की, जिल्हा बँकेला योजनेचा लाभ देण्यास अडचणी येत आहेत. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, बँका शेतकºयांना व्याज भरण्यास बाध्य करतात. बँकेच्या या भूमिकेबाबत लवकरच एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात येईल. शेवटच्या लाभार्थी शेतकºयापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.