शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफी -मुख्यमंत्री
By admin | Published: July 16, 2017 06:58 PM2017-07-16T18:58:40+5:302017-07-16T18:58:40+5:30
जे शेती करतात आणि ज्यांची उपजिविका केवळ शेतीवरच अवलंबून आहे, अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - राज्यात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. निकष आणि अटींमुळे ही कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार याबाबत गोंधळ निर्माण झालेला आहे. त्यामुळे आता कर्जमाफी मिळणाऱ्या शेतकऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले आहे. जे शेती करतात आणि ज्यांची उपजिविका केवळ शेतीवरच अवलंबून आहे, अशाच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
मी मुख्यमंत्री बोलतोय या कार्यक्रमाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी प्रश्नांची उत्तरे देताना कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांबाबतचे निकष मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करून सांगितले,"जे शेतकरी पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत अशांनाच कर्जमाफीचा लाभ मिळेल. ज्या शेतकऱ्यांकडे शेतीव्यतिरिक्त उत्पन्नाची साधने आहेत, त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही."
शेतकऱ्यांना अधिक सवलतीच्या दराने पीककर्ज देण्याबाबत विचार सुरू आहे. ओटीएसमुळे काळ्या यादीत गेलेल्यांनाही नव्याने पीककर्ज देण्यात येईल. शेतमालाला बाजारपेठेशी जोडण्यासाठी बृहद योजना आखण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.