शेतकऱ्यांना वीजबिल माफी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2017 02:47 AM2017-04-21T02:47:14+5:302017-04-21T02:47:14+5:30
राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची वीजपंपांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील असून
पुणे : राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे तब्बल १८ हजार कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. यातील सात हजार कोटी रुपयांची वीजपंपांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील असून, बडे शेतकरी, बागायतदार आणि निर्यातदारही वीज बिले भरायला तयार नाहीत असे सांगून शेतकऱ्यांना वीजबिल माफी देता येणार नाही, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शेतकऱ्यांच्या वीज थकबाकीवरील दंड, व्याज माफ करण्यात येणार आहे. त्यांना पाच टप्प्यात दर तीन महिन्यांनी ही थकबाकी भरता येईल, याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी थकबाकी भरावी, असे आवाहनही त्यांनी केले.
विजेची निर्मिती, पुरवठा यासाठी प्रती युनिट सहा रुपये खर्च येतो. मात्र, शेतकऱ्यांना शेतीसाठी हीच वीज १ रुपया २० पैशांनी पुरवण्यात येते. एका युनिटमागे पाच रुपयांची सूट देऊनही राज्यात जवळपास ४० लाख शेतकऱ्यांनी १८ हजार कोटी रुपये थकवले आहेत. त्यातील मूळ रक्कम १५ हजार कोटींची असून ३ हजार कोटी रुपयांचे दंड व्याज आहे. शासनाने हे दंड व्याज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, मूळ थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
ज्या जिल्ह्यातील अथवा गावांमधील वसुली होईल त्या पैशांमधून या गावांमध्ये नवीन कनेक्शन आणि नवीन कामे केली जाणार आहेत. थकबाकीची ही रक्कम वसूल करण्यासाठी गावागावात मेळावे घेण्यात येणार आहेत. स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींनी हे मेळावे घ्यावेत, असे आवाहन बावनकुळे यांनी केले. (प्रतिनिधी)
वंचित १९ लाख कुटुंबाना
वीज पुरवणार
राज्यातील तब्बल १९ लाख कुटुंबापर्यंत अद्यापही वीज पोचलेली नाही. त्या कुटुंबांना २०१९ पर्यंत वीज देण्याची योजना आखण्यात आली आहे. यासोबतच आगामी काळात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बारा तासापर्यंत वीज देण्याचा प्रयत्न करणार आहे.
- चंद्रशेखर बावनकुळे,
ऊर्जामंत्री-महाराष्ट्र सरकार