शेतकऱ्यांनो, कापूस विकायची घाई नको; गरजेपुरता विकून दिवाळी करा साजरी, तज्ज्ञांचे आवाहन

By सुनील चरपे | Published: October 15, 2022 09:08 AM2022-10-15T09:08:43+5:302022-10-15T09:09:09+5:30

शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची घाई न करता, गरजेपुरता कापूस विकून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन बाजारतज्ज्ञ व अभ्यासकांनी केले आहे.

farmers do not rush to sell cotton celebrate diwali by selling as needed experts appeal | शेतकऱ्यांनो, कापूस विकायची घाई नको; गरजेपुरता विकून दिवाळी करा साजरी, तज्ज्ञांचे आवाहन

शेतकऱ्यांनो, कापूस विकायची घाई नको; गरजेपुरता विकून दिवाळी करा साजरी, तज्ज्ञांचे आवाहन

googlenewsNext

सुनील चरपे, लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील हंगामात १४ हजार रुपये प्रतिक्विंटलवर गेलेले कापसाचे दर सध्या ७,५०० ते ८,००० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. जागतिक व देशांतर्गत बाजारात कापसाच्या दरातील ही घसरण सुरूच आहे. बाजारातील कापसाच्या आवक आणि दराचे खरे चित्र जानेवारीमध्ये स्पष्ट हाेईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची घाई न करता, गरजेपुरता कापूस विकून दिवाळी साजरी करावी, असे आवाहन बाजारतज्ज्ञ व अभ्यासकांनी केले आहे.

देशातील मिल व जिनिंग, प्रेसिंग मालकांच्या संघटनांकडून बाजारातील कापसाच्या मागील व चालू हंगामांतील याच काळातील आवक यावर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला जाताे. ते आकडे जानेवारीमध्ये येतील. कापसाची आवक किती आहे, यावर हा अंदाज वर्तवलेला असताे. आवक कमी झाल्यास कापसाचे दर वधारतील किंवा आवक वाढल्यास दर कमी हाेतील अथवा स्थिर राहतील, असे काॅटन ॲडव्हायझरी बाेर्डचे माजी सदस्य तथा जिनर विजय निवल व इतर जिनिंग मालकांनी सांगितले. दरातील चढ-उतार जागतिक बाजारावर अवलंबून असेल, असे शेतकरी संघटनेचे पाईक विजय जावंधिया म्हणाले.

सूतगिरण्या बंद, कापड गिरण्या अर्ध्यावर

देशभरातील ५५ ते ६० टक्के सूतगिरण्या सध्या पूर्णतः बंद आहेत. माेठ्या कापड गिरण्यांमध्ये एक ते दाेन शिफ्टमध्ये काम सुरू असून, ६० टक्के छाेट्या गिरण्या बंद आहेत. त्यामुळे कापसाची मागणी घटली आहे. या गिरण्या पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर कापसाची मागणी वाढेल. 

आयात शुल्क रद्द, निर्यातीला सबसिडी हवी

- केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क ३१ ऑक्टाेबरपर्यंत पूर्णपणे रद्द केले आहे. त्यामुळे थाेडा कापूस आयात करून देशांतर्गत भाव पाडण्याचे काम होते. 

- चीन व व्हिएतनाममधून माेठ्या प्रमाणात सुताची आयात केली जात आहे. कापसावरील आयात शुल्क सुरू करून त्यात वाढ करावी; तसेच कापसाच्या निर्यातीला साखरेप्रमाणे सबसिडी द्यावी, अशी मागणी होत आहे. 

उत्पादन घटणार : या वर्षी देशात १२८ लाख हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी करण्यात आल्याने उत्पादन किमान नऊ टक्क्यांनी वाढणार असल्याचा अंदाज सरकारने व्यक्त केला होता. काॅटन बेल्टमध्ये सततचा अतिमुसळधार पाऊस, ढगाळ वातावरण, झाडांची खुंटलेली वाढ, पातीगळ, बाेंडसड, गुलाबी बाेंडअळी व रस शाेषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यांमुळे उत्पादन मागील वर्षीएवढे किंवा त्यापेक्षा कमी हाेण्याचा अंदाज आहे.

सध्याचे सरासरी दर

महाराष्ट्र     ७,५०० ते ८,४०० रु.
दक्षिण भारत    ७,६०० ते १०,२०० रु.
उत्तर भारत    ७,८०० ते ८,४०० रु. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: farmers do not rush to sell cotton celebrate diwali by selling as needed experts appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.