शेतक-यांनो आता रडायचे नाही लढायचे!

By Admin | Published: September 24, 2015 01:13 AM2015-09-24T01:13:08+5:302015-09-24T01:13:08+5:30

राजू शेट्टी यांचे आवाहन; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी स्वातंत्र्य एल्गार मेळावा.

Farmers do not want to fight now! | शेतक-यांनो आता रडायचे नाही लढायचे!

शेतक-यांनो आता रडायचे नाही लढायचे!

googlenewsNext

वाशिम : गत तीन चार वर्षांपासून कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळामुळे शेतकर्‍यांना सातत्याने नापिकीचा सामना करावा लागत आहे. अशातच गत दीड वर्षापासून वीज जोडणीची मागणी केल्यानंतरही वीज जोडणी मिळाली नाही; मात्र राज्याचा पोशिंदा असलेल्या शेतकर्‍यांनी आत्महत्या करु नये. शेतकर्‍यांनो आता रडायचे नाही, तर लढायचे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, खासदार राजु शेट्टी यांनी सोमवारी वाशिम येथील शेतकरी स्वातंत्र्य एल्गार मेळाव्यात केले. स्वाभिमान शेतकरी संघटनेच्यावतीने वाशिम जिल्हय़ातील मालेगाव तालुक्यातील जउळका रेल्वे येथे, शहीद शेतकरी स्व. दत्ता लांडगेचे बलीदान व्यर्थ जावू नये यासाठी शेतकरी स्वातंत्र्याचा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता. दत्ता लांडगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती. कार्यक्रमापूर्वी मान्यवरांनी लांडगे यांच्या कुटुंबियांची भेट देवून त्यांचे सात्वंन केले. या मेळाव्यात पश्‍चिम विदर्भातून मोठय़ा संख्येने आलेल्या शेतकर्‍यांना संबोधीत करताना खासदार शेट्टी म्हणाले की, शेतीसाठी कर्ज काढणे हा शेतकर्‍यांचा अधिकार आहे. संसदेत सरकार शेतकर्‍यांच्या हितासाठीच पीक कर्जाची तरतुद करीत असते. बँका व सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कर्जपुरवठा करण्याची व्यवस्था सरकारने निर्माण केलेली आहे; मात्र बँका शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज देत नाही आणि खिशात पैसा नाही, अशा परिस्थितीत शेतकरी सावकारांकडे धाव घेवून अव्वाच्या सव्वा व्याज दराने कर्ज घेतात आणि यातूनच पुढे आत्महत्येच्या घटना घडतात. यापुढे शेतकर्‍यांच्या आत्महत्या होवू नये आणि स्व. दत्ता लांडगे यांचे बलीदान व्यर्थ जावू नये, यासाठी जउळका येथून शेतकरी आत्महत्या निवारण अभियानाची मशाल संपूर्ण महाराष्ट्रात फिरविली जाईल, अशी घोषणा राजू शेट्टी यांनी यावेळी केली. शेतकर्‍यांची संपूर्ण कर्जमाफी करुन आत्महत्येच्या उंबरठय़ावर असलेल्या शेतकर्‍यांना वाचविण्यासाठी आता रडण्याची नव्हे तर हिमतीने लढण्याची तयारी करा, असे आवाहन खा. शेट्टी यांनी शेतकर्‍यांना केले. यावेळी शेट्टी यांनी सर्व शेतकर्‍यांना आत्महत्या करणार नाही, याची शपथ दिली. याप्रसंगी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी शेतकर्‍यांना आत्महत्या करु नका, अशी भावनिक साद घालत, संकटावर मात करण्यासाठी हिमतीने जगण्याचा संदेश दिला. शेतकर्‍यांनी गायी, म्हशी, शेळी, मेंढी पाळून जोडधंदा करा, मात्र मृत्यूला कवटाळू नका, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी शेतकरी पुत्रांसाठी आयएएस, आयपीएस, एमपीएससी अशा विविध स्पर्धा परिक्षांच्या मार्गदर्शन कार्यशाळांचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मुलूखमैदानी तोफ म्हणून ख्याती असलेले सदाभाऊ खोत यांनी आपल्या खास शैलीत शेतकर्‍यांशी संवाद साधला. राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबाव्यात म्हणून, जउळका येथून रणशिंग फुंकण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकर्‍याने अन्नधान्याचे उत्पादन केले नसते तर, लोकांनी काय लोखंड, माती खाल्ली असती का, असा प्रश्न करीत शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, तसेच त्यांच्या मालाला योग्य भाव, वीज, बियाणे व कर्ज वेळेवर मिळालेच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. नशिबी अठराविश्‍व दारिद्रय़ असते तरी, न घाबरता संकटाचा सामना करा. हातात विषाच्या बाटली घेण्याऐवजी क्रांती घडविण्यासाठी लढण्यास सज्ज व्हा, असे आवाहन त्यांनी केले. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्यासह प्रा. प्रकाश पोफळे (नांदेड) आणि जालींदर पाटील (कोल्हापूर) यांनीही मेळाव्याला मार्गदर्शन केले.

*एक लाखाची मदत

        दिवंगत दत्ता लांडगे यांच्या कुटुंबियांना एक लाख रुपयांच्या अनामत रकमेची कागदपत्रे देण्यात आली. यामध्ये रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांनी ५१ हजार रुपये, अकोल्यातील प्रभात किडस स्कूलच्या विद्यार्थ्यांंनी संचालक गजानन नारे यांच्या मार्गदर्शनात खाऊचे पैसे जमा करुन २२ हजार रुपये आणि खासदार राजू शेट्टी यांनी केलेल्या मदतीचा समावेश आहे.

Web Title: Farmers do not want to fight now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.