समन्वय समितीकडूनच शेतकऱ्यांची फरफट
By admin | Published: June 4, 2017 12:58 AM2017-06-04T00:58:03+5:302017-06-04T00:58:03+5:30
शेतकरी आंदोलनाच्या समन्वय समितीतील काँग्रेस व भाजपाच्या समर्थकांनी विसंगत व धरसोड भूमिका घेतल्यामुळे फरफट झाल्याची शेतकऱ्यांची
- सुधीर लंके। लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : शेतकरी आंदोलनाच्या समन्वय समितीतील काँग्रेस व भाजपाच्या समर्थकांनी विसंगत व धरसोड भूमिका घेतल्यामुळे फरफट झाल्याची शेतकऱ्यांची भावना असून, ही समन्वय समिती कोणी निवडली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पुणतांबा ग्रामस्थांनी ३ एप्रिलला संपाचा इशारा दिल्यानंतर समन्वय समितीची स्थापना झाली. त्यात डॉ. धनंजय धनवटे, धनंजय जाधव व धनंजय धोरडे हे स्थानिक नेते सक्रिय होते. नंतर औरंगाबाद जिल्ह्यातील जयाजीराव सूर्यवंशीही सामील झाले. मात्र विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत १६ मे रोजी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत संप स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.
शुक्रवारी रात्री जयाजीराव सूर्यवंशी, जाधव यांनी धनवटे यांच्याच धर्तीवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन संप मागे घेत असल्याची घोषणा केली. समन्वय समितीतच दोन गट आहेत.
सूर्यवंशी, गिड्डे यांची खेळी
आंदोलनाच्या कृती समितीत एकूण २१ सदस्यांचा समावेश आहे. मात्र, हे सर्व सदस्य मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेला उपस्थित नव्हते. २१ सदस्यांची निवड कुणी व कशी केली? हाच प्रश्न आता उपस्थित झाला आहे. संदीप गिड्डे व सूर्यवंशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप डॉ. अजित नवले यांनी केला आहे.