कोरड्या विहिरीत शेतकऱ्याचे उपोषण
By admin | Published: May 8, 2017 04:28 AM2017-05-08T04:28:37+5:302017-05-08T04:28:37+5:30
शेतीत पुरेसे उत्पन्न न निघाल्याने कर्ज न भरल्याने पतपेढीकडून जमीन जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मन्याळे येथील शेतकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोले (जि. अहमदनगर) : शेतीत पुरेसे उत्पन्न न निघाल्याने कर्ज न भरल्याने पतपेढीकडून जमीन जप्तीची कारवाई टाळण्यासाठी मन्याळे येथील शेतकरी भैरवनाथ शंकर जाधव हे स्वत:च्या कोरड्या विहिरीत उपोषणाला बसले आहेत.
जाधव यांनी खासगी पतसंस्थेकडून कर्ज घेतले असून त्याचा जमिनीवर बोजा आहे. जमिनीची जप्ती झाल्यास विषप्राशन करून कोरड्या विहिरीत आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी पोलीस स्टेशन, तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
मी २००५ मध्ये घरबांधणीसाठी कर्ज घेतले होते. शेतात काहीच पिकत नाही. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे? पाऊस नसल्याने पाण्याची व्यवस्था नाही. शेतात उत्पन्न निघाल्यानंतर मी सर्व कर्ज फेडेन, असे जाधव यांनी सांगितले.
वसुली पुढे ढकलली
जाधव यांनी दीड लाखाचे कर्ज घेतले होते. त्याचे आता पाच लाख रुपये झाले आहेत. पतपेढीने दोनदा वसुलीसाठी कर्मचारी पाठविले. परंतु जाधव यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. वसुली अधिकारी नसल्याने आम्ही सध्या कारवाई पुढे ढकलत आहोत, असे यशोमंदिर पतपेढीचे मुख्य वसुली अधिकारी सुरेश आरोटे यांनी सांगितले.