मुलीच्या शिक्षणाच्या चिंतेतून शेतकरी पित्याची आत्महत्या
By admin | Published: June 18, 2015 08:19 PM2015-06-18T20:19:01+5:302015-06-18T20:19:01+5:30
दहावीत ८७ टक्के गुण ; उच्च शिक्षणासाठी पैसाच नाही.
वल्लभनगर (जि. अकोला) : आधीच हलाखीची परिस्थिती, त्यात सततची नापिकी अन् कर्जाचा वाढता डोंगर.. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मुलीने दहावीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण मिळविले; मात्र तिच्या उच्च शिक्षणासाठी पैसा कुठून आणायचा, या विवंचनेत एका अल्पभूधारक शेतकर्याने बुधवारी आत्महत्या केली. निंभोरा येथील धनराज ओहे (४३) यांच्याकडे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. त्यांना एक भाऊ व दोन बहिणी तसेच पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. मुलगी आरतीसह कुटुंबातील प्रत्येकाला आर्थिक परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळे आरतीने शिकून ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार केला. वर्षभर मन लावून अभ्यास केला, त्याचे चांगले फळही मिळाले. दहावी परीक्षेत तिला तब्बल ८७ टक्के गुण मिळाले. आपल्या मुलीने खूप शिकावे, अशी ओहे यांची इच्छा होती. मात्र मुलीच्या उज्ज्वल भविष्याच्या मार्गात आर्थिक स्थिती अडसर ठरत असल्याची चिंता त्यांना अस्वस्थ करीत होती. या विवंचनेतच त्यांनी बुधवारी सकाळी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.