शेतकऱ्याचा मित्र संकटात; भ्रामक समजुती मांडूळ सापाच्या जिवावर
By atul.jaiswal | Published: August 15, 2018 08:53 AM2018-08-15T08:53:55+5:302018-08-15T11:10:11+5:30
सरीसृप वर्गातील अत्यंत शांत, निरुपद्रवी आणि शेतक-यांचा मित्र म्हणून ओळखला जाणारा मांडूळ जातीचा साप हा त्याच्याबाबत लोकांमध्ये पसरलेल्या भ्रामक समजुतीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
अकोला : सरीसृप वर्गातील अत्यंत शांत, निरुपद्रवी आणि शेतक-यांचा मित्र म्हणून ओळखला जाणारा मांडूळ जातीचा साप हा त्याच्याबाबत लोकांमध्ये पसरलेल्या भ्रामक समजुतीमुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी तसेच औषधे बनविण्यासाठी विदेशात या सापाचा उपयोग होतो, अशा एक ना अनेक कपोलकल्पित समजुती पसरल्यामुळे या सापाला आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधींची किंमत मिळत आहे. त्यातूनच या तस्करी करणा-या टोळ्या वाढल्या असून, त्यामुळे या सापाचे अस्तित्वच धोक्यात येण्याची शक्यता सर्पतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
अकोल्यात गत आठवड्यात मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली. यापूर्वीही जिल्ह्यात मांडूळ सापाची तस्करी करणारे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. अलीकडच्या काळात या सापाच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात सर्पतज्ज्ञांकडून माहिती घेतली असता, या सापाबद्दल असलेल्या चुकीच्या समजुती हेच तस्करीमागचे मुख्य कारण असल्याचे समोर आले. मांडूळ साप हा गुप्तधन शोधणे, पैशांचा पाऊस पाडणे, यासाठी उपयोगाचा असल्याची भ्रामक समजूत लोकांमध्ये पसरली आहे.
वास्तविक पाहता मांडूळ साप हा अत्यंत शांत, निरुपद्रवी व बिनविषारी असून, तो भुसभुशीत जमिनीत बीळ करून राहतो. त्यामुळे हा साप भूगर्भात दडलेले गुप्तधन शोधून काढतो, असा चुकीचा समज पसरला आहे, असे ज्येष्ठ सर्पतज्ज्ञ व वन विभागाचे मानद वन्यजीव रक्षक बाळ ऊर्फ जयदीप काळणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मांडूळ हा साप दंडगोलाकार असून, त्याचे शेपूट व डोक्याचा भाग हा एकसारखा असल्यामुळे या सापाला ‘दुतोंड्या’ असेही संबोधले जाते.
औषधे उपयोगाबाबत प्रश्नचिन्ह
मांडूळ सापाचा वापर हा चीन व इतर देशांमध्ये औषधांसाठी होतो, असे मानले जाते. एड्स या जीवघेण्या रोगावरील औषधासाठी मांडूळ उपयोगी असल्याचे मानले जाते. तथापि, यासंदर्भात कुठलाही आधार आढळत नाही. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञही याबाबत मौन बाळगतात.
जिल्ह्यात दोन कारवाया
मांडूळ सापाची तस्करी करणा-या टोळ्या संपूर्ण राज्यात कार्यरत असून, त्यांचे आंतरराज्यीय ‘कनेक्शन’ असल्याचे समोर आले आहे. अकोला जिल्ह्यात पोलिसांनी गत वर्षभरात दोन कारवाया करून मांडूळ तस्करी करणा-यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. गतवर्षी चोहोट्टा बाजारनजीक मांडूळ सापाची खरेदी-विक्री करणा-यांना पोलिसांनी जेरबंद केले होते. यावर्षी १० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय महामार्गावरील राधास्वामी सत्संग केंद्राजवळ मांडूळ सापाची तस्करी करणा-या सहा जणांची टोळी पकडली. यावर्षी मार्च महिन्यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथेही पोलिसांनी मांडूळ तस्करी करणा-यांच्या मुसक्या आवळल्या होत्या.
मांडूळ साप हा निरुपद्रवी असून, तो शेतक-यांचा मित्र आहे. गुप्तधन शोधण्यासाठी त्याचा कोणत्याही प्रकारे उपयोग होत नाही. या केवळ भ्रामक व चुकीच्या समजुती आहेत. औषधे उपयोबाबतही कोणताही शास्त्रीय आधार नाही.
- बाळ काळणे, सर्पतज्ज्ञ व मानद वन्यजीव रक्षक, अकोला.