शेतकऱ्यांचे मोर्चे, बंदने पालघर दणाणला

By Admin | Published: June 7, 2017 03:46 AM2017-06-07T03:46:04+5:302017-06-07T03:46:04+5:30

संपूर्ण राज्यभर रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पालघर, जव्हार, डहाणू, वाडा येथे निघालेल्या मोर्चांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

Farmers' Front, Bandar Palghar Grave | शेतकऱ्यांचे मोर्चे, बंदने पालघर दणाणला

शेतकऱ्यांचे मोर्चे, बंदने पालघर दणाणला

googlenewsNext

आपल्या विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ पालघर, जव्हार, डहाणू, वाडा येथे निघालेल्या मोर्चांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला तर विक्रमगडमध्ये पुकारलेला बंदही कडकडीत पाळला गेला. त्याचे आयोजन किसानसभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केले होते. याकाळात कोणताही अनुचित प्रकार घडला नसला तरी त्याचा फटका हातावर पोट असणाऱ्या गोर-गरीबांनाच जास्ती बसला.
लोकमत न्यूज नेटवर्क
डहाणू : महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांच्यावतीने आपल्या मागण्यांसाठी सुरू केलेल्या संपाला पाठिंबा देण्याकरीता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी पुकारलेल्या बंदला डहाणू शहरात संमिश्र प्रतिसाद लाभला, तर बाजारपेठेत कडकडीत बंद पाळला.
सागरनाका येथे माकपच्या कार्यकर्त्यांनी भाजप सरकार विरोधात निदर्शेने केली. एडवर्ड वरठा, एल.बी.धनगर, विनोद निकोले यांनी भाषणे केली. महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करून, अन्य अत्यावश्यक मागण्या त्वरीत मान्य कराव्यात ही मागणी करण्यात आली. सकाळी इराणी रोड, थर्मल पॉवर रोडवर काही भागात दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र माकपच्या कार्यकर्त्यांनी दुकाने बंद केली. यावेळी रडका कलांगडा व एल बी. धनगर, विनोद निकोले, लहानी दौडा, चंद्रकांत घोरखना, चंदू कोम, मेरी रावते चंद्रकांत वरठा, रामदास सुतार, कमल वानले, दत्तू दुमाडा, यशवंत कडू आदिंनी प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर मोर्चा विसर्जित झाला.
>कर्जमाफीसाठी किसान सभेचा मोर्चा
वाडा: शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी या प्रमुख मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी किसान सभेच्यावतीने आज तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध करण्यात आला. खंडेश्वरी नाका येथून मोर्चा काढण्यात आला.तो शहरातील प्रमुख रस्त्यांवरून नेण्यात आला. त्यानंतर त्याचे रुपांतर तहसीलदार कार्यालयासमोर सभेत करण्यात झाले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. या मोर्चाचे नेतृत्व किसान सभेचे वाडा तालुका अध्यक्ष सुनिल पाटील व कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुनील धानवा यांनी केले होते. त्याला शेतकरी व शेतमजूरांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. मोर्चामुळे वाहतूकीचा खोळंबा झाला होता.शेतकर्यांचा ७/१२ कोरा करा, स्वामिनाथन शिफारशी लागू करा, शेतीसाठी बिनव्याजी कर्जपुरवठा करा, शेतकरी शेतमजूर यांना वयाच्या ६० वर्षानंतर पेन्शन द्या, दुधाला प्रतिलिटर ५० रूपये भाव द्या, ठिबक, तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान द्या, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने अतिग्रहित करणारे समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन, दिल्ली कॉरिडोर मार्ग हे प्रकल्प रद्द करावेत यामागण्याक करण्यात आल्या.
जव्हार प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांची निदर्शने
जव्हार : शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाच्या नेतृवाखाली जव्हार तालुक्यातील माकपाच्या शेकडो कार्यक्रत्यांनी मंगळवारी प्रांत कार्यालयावर निदर्शने करून केंद्र व राज्यातील भाजप सरकारवर टीकेची झोड उठविली. उपविभागीय अधिकारी पवनीत कौर यांना निवेदन दिले. पिकांना हमी भाव द्या, शेतकऱ्यांची सरकारकडून होणारी पिळवणूक थांबवा, पिक कर्ज माफ करा, अशा मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांना पाठींबा म्हणून ही निदर्शने झाली. जि. प.सदस्य रतन बुधर, पं.स. सदस्य लक्ष्मण जाधव, तसेच यशवंत बुधर, विजय शिंदे, शांतीबाई खुरकुटे आदींनी नेतृत्व केले.
>विक्र मगडमधे कडकडीत बंद, व्यापाऱ्यांचाही पाठिंबा
विक्रमगड : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठीच्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून कम्युनिस्टांनी पुकारलेला बंद कडकडीत झाला. त्याला व्यापारी असोशिएशन आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने बाजार पेठ सकाळपासून पूर्णपणे बंद होती. याचा फटका पावसाळापूर्व खरेदी करणाऱ्या नागरीकांना बसला आहे. शेतकऱ्यांना कर्ज माफी, उत्पादन खर्चावर आधारित भाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी हा बंद होता. मोर्चा काढून तहसिल कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सोमवारच्या बंदमुळे आधीच त्रस्त झालेल्या जनतेच्या कष्टात या बंदमुळे आणखीनच भर पडली. हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटी तर सलग दुसऱ्या दिवशी बुडाली.
या बंदमुळे बाजारपठेतील खरेदी-विक्र ी व्यवहार पूर्णपणे मंदावला होता. याचा फटका पावसाळा जवळ आल्याने पावसाळापूर्व खरेदी करणाऱ्या ग्राहकाना बसला असून दूरवरून खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाती परत जावे लागले.
या बंदचा काळात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. या वेळी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश सोनवणे यांना देण्यात आले.

Web Title: Farmers' Front, Bandar Palghar Grave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.