शेतकऱ्यांनी पेटविली मोसंबीची बाग
By admin | Published: April 23, 2016 04:02 AM2016-04-23T04:02:24+5:302016-04-23T04:02:24+5:30
गेली चार-पाच वर्षे दुष्काळाने पाठ सोडलेली नाही, त्यामुळे सर्वस्व पणाला लावून जगविलेल्या मोसंबीच्या बागा पाण्याविना जळून जात आहेत
कचनेर (जि. औरंगाबाद) : गेली चार-पाच वर्षे दुष्काळाने पाठ सोडलेली नाही, त्यामुळे सर्वस्व पणाला लावून जगविलेल्या मोसंबीच्या बागा पाण्याविना जळून जात आहेत. त्यात सरकारने फळबागांना काहीही मदत न करण्याचे धोरण निश्चित केल्याने ३५० झाडांची मोसंबीची बाग शेतकऱ्यांनी स्वत: पेटवून दिली.
आघाडी सरकारने केलेल्या मदतीमुळे गेली तीन-चार वर्षे कशाबशा वाचलेल्या हजारो एकर बागा आता पाण्याअभावी जळून जात आहेत. फळबाग वाचविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे आर्थिक पॅकेजची मागणी करूनसुद्धा पदरी काहीही पडलेले नाही. त्यामुळे शुक्रवारी पोरगाव चौफुलीजवळील किसन रावसाहेब गायकवाड यांच्या शेतातील मोसंबीची ३५० झाडे जाळून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. पाण्याअभावी सुकलेली ३५० झाडे या आंदोलनात जाळून टाकण्यात आली.
> कधी येणार पंतप्रधानांचे पथक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठवाड्यासह इतर राज्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी तातडीने विशेष पथक पाठविण्याची घोषणा करून १५ दिवस उलटले आहेत; परंतु अद्यापही पथक आले नाही. हे पथक कधी येणार? सरकारला माहिती कधी सादर करणार? तोपर्यंत या फळबागा वाचतील काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील काय, असे अनेक प्रश्न जयाजी सूर्यवंशी यांनी उपस्थित केले.
> लेकरापेक्षाही अधिक जीव आम्ही या बागांना लावला. लेकरांच्या तोंडातील घास काढून बागा वाढविल्या. मागील चार वर्षे दुष्काळ व सततची पाणीटंचाई, त्यामुळे बेताचेच उत्पादन झाले. उत्पादन खर्चही भागला नाही. डोक्यावरील कर्ज वाढते आहे. दररोज सरपण होत जाणारी बाग पाहून तीळतीळ मरण्यापेक्षा टाकली एकदाची जाळून. एक दिवस रडून गप्प बसता येईल. - किसन गायकवाड