शेतकऱ्यांची १०० क्विंटल तूर पावसात भिजली
By admin | Published: June 5, 2017 04:53 AM2017-06-05T04:53:02+5:302017-06-05T04:53:02+5:30
केंद्राबाहेर रांगेत असलेल्या १४० वाहनांपैकी दोन वाहनांमधील सुमारे १०० क्विंटल तूर शनिवारी रात्री झालेल्या पावसात भिजली
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (जि. परभणी) : येथील शासकीय तूर खरेदी केंद्राबाहेर रांगेत असलेल्या १४० वाहनांपैकी दोन वाहनांमधील सुमारे १०० क्विंटल तूर शनिवारी रात्री झालेल्या पावसात भिजली. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे टाकले आहे. रविवारी तूर वाळविण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ झाली.
गंगाखेडच्या तूर खरेदी केंद्रावर गंगाखेड, पालम आणि सोनपेठ या तीन तालुक्यांतील ६३८ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ५१० शेतकऱ्यांना तूर खरेदीचे टोकन मिळाले आहे. काटा सुरु असल्याने १८९ वाहने खरेदी केंद्राबाहेर रांगेत उभी होती. ४० वाहनांमधील तूर खरेदी करण्यात आली. परंतु, १ जूनपासून हे केंद्र बंद झाले आहे. केंद्र सुरु करण्याचे आदेश लवकरच प्राप्त होतील, या आशेने ३०० शेतकऱ्यांनी १४० वाहने रांगेतच उभी केली आहेत. शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. मात्र कुठलेही आच्छादन नसल्याने दोन वाहनांतील सुमारे १०० क्विंटल तूर भिजली.
३१ मेपर्यंतच तूर खरेदी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. पुढील आदेश नसल्याने तुरीचा काटा बंद आहे, असे दुय्यम निबंधक बी. बी. राठोड व खरेदी -विक्री संघाचे व्यवस्थापक लक्ष्मण भोसले यांनी सांगितले.