दूध दराबाबत बैठक निष्फळ ठरली; शासकीय आदेशाची होळी, २४ नोव्हेंबरला राज्यात आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 06:41 PM2023-11-21T18:41:01+5:302023-11-21T19:19:00+5:30
आजची संपूर्ण बैठक अयशस्वी ठरली. सरकारचा आदेश जुमानला जात नाही. सरकारी दर देणार नाही अशी भूमिका कंपन्यांनी घेतली
मुंबई - राज्य शासनाने २४ जुलै २०२३ रोजी काढलेल्या दूध दर परिपत्रकेप्रमाणे सहकारी व खाजगी दूध संघ दूध उत्पादकांना दर देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे.परंतु आजच्या बैठकीत याबाबत कोणताच निर्णय झाला नसल्याने आजची बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे शेतकरी नेते सदाभाऊ खोत, अजित नवले तसेच इतर संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांनी या शासन परिपत्रकाची सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे होळी केली. तसेच येत्या २४ नोव्हेंबरला राज्यभर या शासन परिपत्रकाची होळी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याबाबत सदाभाऊ खोत म्हणाले की, आज राज्यात काही ठिकाणी २५ तर काही ठिकाणी २६ रुपये दुधाला भाव आहे. शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार ९ ते १० रुपये भाव दूध उत्पादकांना कमी मिळत आहे. सरकार यावर बोलायला तयार नाही. आजची बैठक अपयशी ठरली. त्यामुळे २४ नोव्हेंबरला दरपत्रकाची होळी राज्यातील दुध उत्पादक गावागावातील दूध संकलनासमोर करतील असा इशारा त्यांनी दिला.
तसेच दुग्धविकास मंत्र्यानी दूध संघ, दूध कंपन्या व शेतकरी प्रतिनिधींची दुध दराबाबत बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. सरकारने काढलेला दूध दर आदेश दूध कंपन्यांनी धुडकावून लावला आहे. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे ३४ रुपये दर देण्यास नकार दिला. सरकारच्या आदेशाची अशी अवहेलना होत असताना सरकार आजच्या बैठकीत केवळ गुळमुळीत सारवासारव करताना दिसले. सरकारच्या आदेशाची किंमत रद्दीची असल्याचे यामुळे सिद्ध झाले. असे रद्दी शासनादेशाची २४ नोव्हेंबर रोजी दूध संकलन केंद्रांवर राज्यभर शेतकऱ्यांनी होळी करावी व विविध मार्गाने आंदोलन तीव्र करावे असे आवाहन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने केले आहे.
दरम्यान, राज्यभर शेतकरी कार्यकर्ते उपोषण, रास्तारोको व दुग्ध अभिषेक घालून दूध दराच्या प्रश्नांसाठी आंदोलन करत आहेत. अशा सर्व आंदोलनांना संघर्ष समिती पाठिंबा व्यक्त करत आहे.आजची संपूर्ण बैठक अयशस्वी ठरली. सरकारचा आदेश जुमानला जात नाही. सरकारी दर देणार नाही अशी भूमिका कंपन्यांनी घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही वाली नाही हे चित्र समोर आले. दुग्धविकास मंत्र्यासमोरच शासन आदेशाची होळी करू असा इशारा आम्ही दिला. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन रास्ता रोको करतोय. महाराष्ट्रात दूध उत्पादक लढ्याचा आक्रोश दिसेल अशी भूमिका आजच्या बैठकीत सर्व शेतकरी प्रतिनिधींनी घेतली आहे.