खाऊच्या पैशातून शेतकऱ्यांना मदत!
By admin | Published: September 21, 2015 01:05 AM2015-09-21T01:05:04+5:302015-09-21T01:05:04+5:30
खाऊचे पैसे म्हणजे लहान मुलांसाठी लाखमोलाची गोष्ट असते. पण शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून नागपूरच्या आठ वर्षीय रसिका जोशी या बालिकेने मुख्यमंत्री मदतनिधीला हे सर्व पैसे दिले.
नागपूर : खाऊचे पैसे म्हणजे लहान मुलांसाठी लाखमोलाची गोष्ट असते. पण शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून नागपूरच्या आठ वर्षीय रसिका जोशी या बालिकेने मुख्यमंत्री मदतनिधीला हे सर्व पैसे दिले. मदत करण्यामागची तिची भावना उदात्त असून राज्यातील जनतेला प्रेरणादायी आहे.
अभिनेता आमीर खानने मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची भेट घेऊन मुख्यमंत्री मदतनिधीसाठी चेक दिला. यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांमध्ये बातम्या पाहिल्यानंतर रसिकाने वडील मनोज जोशी यांच्याकडे याबाबत बालसुलभ विचारणा केली. त्यावर, राज्यातील शेतकरी कसे संकटात आहेत व आमीर खान हा चेक त्यांच्या मदतीसाठी देत असल्याचे त्यांनी समजावून सांगितले. ज्या शेतकऱ्यांच्या कष्टांमुळे शाळेत टिफीनमधले अन्न मी खाऊ शकते, ते संकटात असल्याचे ऐकताच रसिकाच्या बालमनालादेखील वाईट वाटले व तिने कुणालाही न सांगता साठविलेले सर्व पैसे एकत्र केले. परिचितांसोबत रविवारी मुख्यमंत्र्यांकडे गेली असता रसिकाने खाऊचे पैसे साठवून ठेवलेली ‘पिगी बँक’च त्यांना सुपूर्द केली.