जालन्यात भाव मिळण्याच्या आशेने शेतकऱ्यांचा कापूस घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 01:36 PM2018-12-10T13:36:24+5:302018-12-10T13:38:04+5:30
बाजारगप्पा : सीसीआयकडून जालन्यातील बाजार समितीत कापूस खरेदी सुरू केली, मात्र अद्यापही पाहिजे तशी आवक या केंद्रावर नसल्याचे सांगण्यात आले.
- संजय देशमुख (जालना)
कमी पावसामुळे यंदा कपाशीचे उत्पन्न ३० टक्क्यांनी कमी झाले आहे. असे असले तरी अद्यापही शेतकऱ्यांनी त्यांच्या घरातील कापूस अर्थात पांढरे सोने गंजी घालून ठेवले असून, त्याला आगामी काळात सहा हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे. सीसीआयकडून जालन्यातील बाजार समितीत कापूस खरेदी सुरू केली, मात्र अद्यापही पाहिजे तशी आवक या केंद्रावर नसल्याचे सांगण्यात आले.
नवीन तूर बाजारात दाखल होत असून, दररोज एक हजार पोती येत असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे तुरीमध्ये २०० रुपये कमी झाले आहेत. बाजारपेठेत दुष्काळाची छाया गडदपणे दिसत आहे. तुरळक व्यवहार सोडल्यास ग्राहकी नसल्याचे वास्तव आहे. अशाही स्थितीत मोसंबी तग धरून आहे. रेशीम कोषाच्या आवकेने बाजारात थोडीबहुत चहलपहल दिसत आहे. बाजारपेठेत सध्या भुसार मालाची आवक बऱ्यापैकी आहे. त्यात गहू १०० पोती असून, भाव २००० ते ३००० हजार रुपये, ज्वारीची आवक ५०० पोती असून, दोन जार ७०० ते ३ हजार ४००, बाजरी १०० पोती आवक असून, १६०० ते २३००, मक्याची आवक कायम असून, दररोज बाजारपेठेत ५००० पोत्यांची आवक असून, १४५० ते १५५० प्रतिक्विंटल मिळत आहे. मक्याचा उपयोग कोंबडी खाद्यासाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने भाव बऱ्यापैकी मिळत आहेत. स्टार्च उद्योगातही मक्याला मोठी मागणी कायम आहे.
हरभऱ्याची आवक दररोज शंभर पोती असून, ४००० ते ४७०० रुपये आहे. सोयाबीनची आवक आजही कायम असून, एक हजार पोत्यांची आवक असून, भाव स्थिर आहेत. सध्या ३ हजार २०० ते ३२५० रुपये क्विंटल भाव मिळत आहे.
साखरेचा चालू महिन्याचा कोटा केंद्र सरकारने लक्षणीयरीत्या कमी करूनही साखरेचे दर जैसे थे आहेत. ३१५० ते ३२५० क्विंटलला साखर विक्री होत आहे. दरम्यान, काही साखर कारखाने आपल्याकडील साखर विक्रीसाठी डॅमेज शुगरच्या नावाखाली कमी भावाने विक्रीसाठी थेट बाजारात आणत आहेत. मिळेल तेवढा पैसा लवकरात लवकर मोकळा करण्याच्या हेतूने हे कारखाने ५० रुपयांनी कमी विक्री करीत आहेत.
कापूस खरेदीस जालन्यातील बाजार समितीत ३ नोव्हेंबरला सभापती तथा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सीसीआायच्या खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. गेल्या आठ दिवसांत या केंद्रावर केवळ ७८० क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. सरकारने पाच हजार ४५० रुपये हा हमीभाव जाहीर केल्याने दर याखाली येणार नाहीत; परंतु मागणी आणि पुरवठा लक्षात घेऊन कापसाचे दर सहा हजार रुपयांवर जातील या आशेने शेतकरी अद्याप पूर्ण क्षमतेने कापूस बाजारपेठेत आणत नसल्याचे वास्तव असल्याची माहिती कॉटन फेडरेशन, तसेच टेक्सटाईल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल फॉर कॉटनचे संचालक संजय राठी यांनी सांगितले. कपाशीचे उत्पादन यंदा ३० टक्के कमी झाले आहे, हे नाकारून चालणार नाही; परंतु अद्यापही शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे.