शेतकऱ्यांनो जोडधंदा पहा! आजोबांनी शंभर वर्षांपूर्वी लावलेले झाड आज पण देते लाखोंचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 12:39 PM2023-04-17T12:39:23+5:302023-04-17T12:40:01+5:30
Farmers Extra Income: नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील शेतकरी गजानन चव्हाण यांच्या आजोबांनी शेताच्या बांधावर एक फणसाचे रोपटे लावले होते.
शेतकऱ्यांना आज शेती करणे परडत नाहीय. अवकाळी, गारपीट, दुष्काळ आदीमुळे शेतीची नासाडी होत आहे. उत्पन्न येत नाहीय. यामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. तसेच नवीन पिढी शेती सोडून शहरात १०-१५ हजाराच्या नोकरीला जाऊ लागली आहे. परंतू नांदेडच्या शेतकऱ्याने आपल्या शेतकरी बांधवांना एक आशेचा किरण दाखविला आहे.
नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील शेतकरी गजानन चव्हाण यांच्या आजोबांनी शेताच्या बांधावर एक फणसाचे रोपटे लावले होते. याला आता जवळपास सव्वाशे वर्षे होत आली. तीन वर्षांनी या रोपाला फणस लगडू लागले होते. एवढे वय असूनही या झाडाला आजही २०० ते ३०० फणस लागत आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. आज वड-पिंपळ सोडले तर एवढे जुने वृक्ष सापडत नाहीत. परंतू, हे फणस विकून शेतकरी लाखोंचे उत्पन्न घेऊ शकतात, असा दावा गजानन चव्हाण यांनी केला आहे.
फणसाला बाजारात मोठी मागणी असते. कच्चा असताना भाजी आणि पिकला की गरे खायला मिळतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांनी असल्या फणसाच्या झाडाचे रोप आणून त्याची लागवड करावी. किलोला बाजारात दीडशे ते दोनशे रुपयांचा दर आहे. अशाप्रकारे हे शेतकरी दोन ते तीन लाख रुपये कमवू शकतात, असे चव्हाण म्हणाले. या झाडाचा जोडधंदा म्हणून उपयोग होईल, असे ते म्हणाले.
नांदेड जिल्ह्यामध्ये क्वचित ठिकाणी या फणसाची झाडे आढळतात. नांदेडच्या बाजारामध्ये देखील या फळाला खूप मोठी मागणी आहे. हेच फणस बाजारामध्ये विकली तर दोन ते तीन लाख रुपयांचे उत्पन्न देखील शेतकऱ्यांना मिळते. पण चव्हाण परिवार हे फळ विकत नसून आजूबाजूतील परिसरातील शेतकरी हे फळ खाण्यासाठी घेऊन जातात व चव्हाण परिवाराला त्यामध्ये आनंद वाटतो. यामागे कारण की, आमच्या शेतामध्ये असलेले हे आजोबांनी लावलेले झाड आज पण जिवंत आहे व या झाडातून आजूबाजूतील शेतकऱ्यांना फळाच्या माध्यमातून आनंद मिळतो. त्यात आम्हाला समाधान आहे, असे शेतकरी गजानन चव्हाण यांनी सांगितले.