तासाभरातच धान्य संपल्याने शेतकरी हरखले

By admin | Published: May 2, 2017 02:46 AM2017-05-02T02:46:54+5:302017-05-02T02:46:54+5:30

शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत पोचल्याचा कसा फायदा होतो, त्याच अनुभव सोमवारी ठाण्यातील आंबा आणि धान्य महोत्सवात

The farmers lose their food after an hour | तासाभरातच धान्य संपल्याने शेतकरी हरखले

तासाभरातच धान्य संपल्याने शेतकरी हरखले

Next

ठाणे : शेतकऱ्यांचा भाजीपाला थेट ग्राहकापर्यंत पोचल्याचा कसा फायदा होतो, त्याच अनुभव सोमवारी ठाण्यातील आंबा आणि धान्य महोत्सवात आला. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे धान्य थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा पहिला प्रयोग सुरू झाला आणि त्याचा शुभारंभ होण्याच्या आधीच काही शेतकऱ्यांचे २०० किलो मुग आणि हरडा, शेवया, रवा असे एक क्विंटल धान्य काही तासातच संपल्याने शेतकरी हरखून गेले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पसरला आणि इतर शेतकऱ्यांनाही हुरूप आला.
शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर मार्ग काढण्यासाठी त्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत पोचविण्याचा प्रयोग विविध ठिकाणी राबविला जात आहे. याचाच एक भाग म्हणून ठाण्याच्या गावदेवी मैदानात धान्य महोत्सव सुरू झाला. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, हिंगोली आदींसह इतर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आशेने सहभागी झाला आहे. मालाला चांगला भाव मिळेल की नाही, याबाबत त्याच्या मनात शंका होती. परंतु नाम फाऊंडेशन आणि संस्कार प्रतिष्ठानची साथ त्यांना लाभल्याने पहिल्याच दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललेले पाहावयास मिळाले.
हिंगोलीवरुन प्रकाश हिंगोले आणि उत्तम भोईर यांनी आणलेले २०० किलो मूग हा महोत्सव सुरु होण्यापूर्वीच स्टॉल मांडत असतांनाच संपल्याने त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. दुसरीकडे शारदा आणि त्यांचे पती अण्णासाहेब जगताप यांनी हुरडा, भरडा, शेवाळ्या रवा, असा जव जवळ दीड क्विंटलचा माल येथे विकण्यासाठी आणला होता. त्यातील एक क्विंटल मालदेखील महोत्सव सुरु होण्यापूर्वीच हातोहात संपल्याने त्यांनाही आनंद झाला. शेतकऱ्याला या महोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या कामाचा आणि श्रमाचा मोबदला मिळत असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. या महोत्सवाच्या माध्यमातून गहू, जवस, मूग, ज्वारी, हळद, तूर, तुरडाळ आदींसह इतर धान्य विकण्यासाठी ठेवण्यात आले आहे. हे धान्य सेंद्रीय पध्दतीने पिकविण्यात आल्याने मागणी वाढत असल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)


आम्ही पिकवणार, आम्हीच विकणार
आमच्या शेतातून पिकविलेला माल आणि त्यालाही चांगली किमंत आम्हाला मिळत आहे. त्यामुळे व्यापाऱ्याकडे हात पसरविण्याची आता आम्हाला गरज राहिलेली नाही. आम्हीच पिकविणार आणि आम्हीच विकणार त्यामुळेच दिड क्विंटल मालापैकी तब्बल १ क्विटंल माल अवघ्या काही तासात विकला गेल्याचे समाधान आहे.
- शारदा आणि अण्णासाहेब जगताप, हिंगोली


पूर्वी व्यापाऱ्यांच्या हाती आपला माल दिल्यावर त्याला हव्या त्या किंमतीत तो माल खरेदी करीत होता. परंतु बाजारात मात्र दुप्पट भावाने विकत होता. यामुळे आम्हा शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. परंतु आता आमचा माल आम्हीच विकत असल्याने आणि पहिल्यापेक्षा १५ ते २० टक्के अधिक मोबदला मिळत असल्याने त्याचा आनंद आहे.
- रायचुरे कदम, बीड


व्यापाऱ्यांना माल विकत असतांना त्याठिकाणी दलालांना देखील मलिदा मिळत होता. त्यात व्यापाऱ्यांपर्यंत माल पोहचविण्याचा जबाबदारी आम्हा शेतकऱ्यांच्या खांद्यावर होती. परंतु फायदा मात्र व्यापारी उचलत होता. परंतु आता खऱ्या अर्थाने आम्हाला चांगला भाव मिळत असल्याचे समाधान मिळत आहे.
- उत्तरेश्वर नखाते व सतीश निगडे, बीड

सेंद्रीय पध्दतीने आम्ही धान्य पिकवत असल्याने आणि थेट ग्राहकापर्यंत जाण्याचा मान आम्हाला आता मिळत असल्याने आमच्याबरोबर ग्राहकांना देखील कमी भावात उच्च दर्जाचा माल मिळत आहे.
- देविदास खोटे, बोरखडे, बीड

शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेल्या मालाचा चांगला मोबदला मिळावा म्हणून हे पाऊल नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून उचलण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना आता व्यापाऱ्यांकडे जाण्याची गरज नसून त्यांचा माल थेट ग्राहकाच्या हाती पडत असून तो ही मार्केटपेक्षा कमी किमतीत मिळत आहे.
- राजाभाऊ शेळके, नाम फाऊंडेशनचे पदाधिकारी

कोकण आणि मराठवाड्याचा हा एक सुंदर मिलाप आहे, एकीकडे कोकणातील आंबा आणि दुसरीकडे विदर्भातील धान्य एकाच छताखाली ग्राहकांना मिळण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून उपलब्ध झाली असून शेतकऱ्यांना देखील पहिल्याच दिवशी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. - आमदार संजय केळकर, आयोजक

Web Title: The farmers lose their food after an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.