‘एक्झर्बिया’मुळे शेतकऱ्यांचे नुकसान
By admin | Published: July 15, 2017 02:55 AM2017-07-15T02:55:42+5:302017-07-15T02:55:42+5:30
पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एक्झर्बिया कंपनीने ओढ्यात मातीचा भराव टाकून बंधारा बांधला होता
कांता हाबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नेरळ : पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एक्झर्बिया कंपनीने ओढ्यात मातीचा भराव टाकून बंधारा बांधला होता; परंतु गुरु वारी हा बंधारा पोकलनच्या साहाय्याने शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता फोडल्याने संपूर्ण पाणी शेतात जाऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच या अचानक आलेल्या पाण्याच्या लोटामुळे जीवितहानी टळली असली, तरीही कर्जत आपत्तीव्यवस्थापन किंवा स्थानिक तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी अद्याप झोपेचे सोंग घेतले आहे.
कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत एक्झर्बिया गृह निर्माण प्रोजेक्ट तीन वर्षांपासून सुरू केला आहे; परंतु या प्रोजेक्टमुळे आतापर्यंत स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात या कंपनीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, प्रशासनाने याकडे डोळेझाक केली असल्याने याचा त्रास शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. याच कंपनीने दोन महिन्यांपूर्वी येथे ब्लास्टिंग केले होते. यामुळे त्यातील मोठमोठे दगड स्थानिकांच्या घरावर पडून घराचे नुकसान झाले होते. असे असताना प्रशासन मात्र या प्रकरणात गप्प का? असा प्रश्न आता स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांना पडला आहे. गुरु वारी या परिसरात शेतकरी शेतीची कामे करत असताना अचानक पाण्याचा लोट आला. आणि यात दोन महिला वाहत गेल्या. मात्र, त्यांना वाचविण्यात यश आले आहे; परंतु शेताचे बांध फुटून लावणी केलेल्या शेतात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव गेल्याने शेताचे पुन्हा नुकसान झाले आहे. या कंपनीचे अधिकारी या शेतकऱ्यांना जुमानत नसल्याने आता शेती नापीक झाल्याने खायचे काय? असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे.
अनेक वेळा स्थानिक तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना अनेकवेळा संपर्ककरूनही दोन दिवस होऊन ही त्यांनी अद्याप या नुकसानीचा पंचनामाही केला नाही, त्यामुळे कंपनी आणि स्थानिक प्रशासन यांचे साटेलोटे असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष घालून या नुकसानीची पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली असून नुकसानभरपाई न मिळल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.
मानवाधिकार संघटनेचा उपोषणाचा इशारा
अखिल भारतीय मानवाधिकाराचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष गोरख शेप यांनी नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करून प्रशासनाने एक्झर्बिया कंपनीला पाठीशी न घालता शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मानवाधिकार संघटना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करेल, असा इशारा दिला आहे.
एक्झर्बिया प्रोजेक्टमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून तत्काळ मंडळ अधिकारी यांच्यामार्फत या नुकसानीचा पंचनामा केला जाईल.
- अविनाश कोष्टी,
तहसीलदार, कर्जत
या संदर्भात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी केली असून, ज्या शेतकऱ्यांचे या पाण्यामुळे शेताचे किंवा शेतात लावलेल्या पिकाचे जे काही नुकसान झाले आहे, त्याची नुकसानभरपाई त्या शेतकऱ्यांना दिली जाईल.
- अजय भाडके, व्यवस्थापक, एक्झर्बिया प्रोजेक्ट
एक्झर्बिया कंपनीने आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता, पाणी आमच्या शेतात सोडल्याने परिसरातील आमच्या शेताचे व पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती नापीक झाली आहे. त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आमच्या शेताचे व पिकांचे जे नुकसान झाले आहे त्याची नुकसानभरपाई मिळावी.
- यशवंत डायरे, शेतकरी