शेतकऱ्यांकडून दूध-भाजीपाल्याची कोंडी?
By admin | Published: May 29, 2017 03:59 AM2017-05-29T03:59:11+5:302017-05-29T03:59:11+5:30
जूनपासूनच्या शेतकरी संपाच्या मोर्चे बांधणीला वेग आला असून दूध-भाजीपाल्याची वाहतूक करणारी वाहने रोखली जाणार आहेत
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : 1 जूनपासूनच्या शेतकरी संपाच्या मोर्चे बांधणीला वेग आला असून दूध-भाजीपाल्याची वाहतूक करणारी वाहने रोखली जाणार आहेत. त्यासाठी महामार्गावर ठिकठिकाणी चौक्या उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे़
ठिकठिकाणच्या शेतकऱ्यांनी दूध- भाजीपाल्याची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे़ अहमदनगरसह नाशिक, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड आदी जिल्ह्यांत संपाचे नियोजन वेगाने सुरू आहे़ किसान क्रांतीच्या समन्वयकांसह विविध संघटना त्यांना मदत करत आहेत़ महामार्गावरील गावांतील शेतकरी ठिकठिकाणी चौक्या उभारण्यात व्यस्त आहेत़, अशी माहिती किसान क्रांती समन्वयक धनंजय धोरडे यांनी दिली. महानगरांच्या आधीच्या गावात दूध-भाजीपाल्याची वाहने अडवली जातील.
शेतकऱ्यांच्या संपाला ३३ संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे़ शेतकरी संघटनेने संप यशस्वी करण्यासाठी जिल्हानिहाय बैठका घेवून नियोजन केले आहे. नगर जिल्ह्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, नाशिक जिल्ह्यात योगेश रायते, पुणे जिल्ह्यात शांताराम कुंजीर मराठवाड्यासह विदर्भात अन्नदाता संघटनेने जयाजीराव
सूर्यवंशी मोर्चेबांधणी करत आहेत, असेही धोरडे म्हणाले. कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह दूधसंघही बंद ठेवण्याबाबत संबंधितांशी चर्चा सुरू आहे.
अनेकांचा पाठिंबा
सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या संपाला सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याची माहिती शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी पुणतांबा येथे सुरू असलेल्या आंदोलनात दिली़ कमलाकार कोते यांनी ५०० शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. हमाल पंचायत संघटनेचे डॉ़ बाबा आढाव यांनी रविवारी पुणतांबा येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनात आम्ही सक्रिय राहू, असे सांगितले.