तूर खरेदीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2017 01:24 AM2017-05-16T01:24:48+5:302017-05-16T02:36:41+5:30

उद्धव ठाकरे यांनी साधला भाजपावर निशाणा

Farmers misunderstood the purchase of tur | तूर खरेदीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल!

तूर खरेदीच्या मुद्यावरून शेतकऱ्यांची दिशाभूल!

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शेतकऱ्यांकडे लाखो क्विंटल तूर पडून असताना शासनाची तूर खरेदीची घोषणा केवळ दिशाभूल करणारी आहे. शेतकऱ्यांप्रती शासन प्रचंड उदासीन असल्याचे यावरू न अधोरेखित होत असून शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, मागण्यांवर कोणतीच प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे सांगून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाना साधला. शिवसेना शेतकऱ्यांसोबत असून, कर्जमुक्ती होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचेही त्यांनी सोमवारी येथे ठणकावून सांगितले.
शिवसंपर्क अभियानांतर्गत शिवसेना नेते,आमदार तसेच नगरसेवकांनी पश्चिम विदर्भातील अकोला,अमरावती आणि बुलडाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यासंदर्भातील वस्तूनिष्ठ अहवाल उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला. या सर्व अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी पक्षाची भूमिका विषद केली. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्ष बांधणी केली जात असून, स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पक्षाच्या पुढील वाटचालीवर निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तूर खरेदीच्या मुद्यावर उद्धव ठाकरे यांना विचारणा केली असता, त्यांनी शासनाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. तूर लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले; पण तूर खरेदीचे शासनाने कोणतेच नियोजन केले नाही. नाफेडद्वारा राज्यात तूर खरेदी सुरू होती; मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता ती बंद करण्यात आली. शिवसेनेने यासाठी आंदोलन उभारले. तेव्हा कुठे नाफेडने ३१ मे पर्यंत १ लाख क्विंटल तूर खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले; पण पंचनामा केलेल्या तुरीच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांच्या घरातील तूर खरेदी केली जात नसल्याचे सांगत भाजपच्या धोरणावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मला शेतीतलं काही कळत नाही,असं बोलल्या जातं. मी कृषीतज्ज्ञ नसलो, तरी शेतकऱ्यांच्या समस्यांची जाण शिवसेनेला असल्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सत्तेत सहभागी असलो, तरी सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांच्या व्यथा, अपेक्षा व्यक्त करतोय, याचा अर्थ भाजपला विरोध करतो, असा होत नसल्याची पुष्टीही उद्धव ठाकरे यांनी यावेळी जोडली. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा इशाराही त्यांनी दिला.पत्रकार परिषदेला पर्यावरण मंत्री रामदास कदम, खा. अरविंद सावंत, खा.विनायक राऊत, खा.प्रतापराव जाधव, खा.आनंदराव अडसूळ, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, आ.गोपीकिशन बाजोरिया उपस्थित होते.

नाशिकच्या मेळाव्यात शेतकरी बोलतील!
सरकार कोणतेही असो, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे अशी त्यांची भावना असते. आम्ही सत्तेत राहून तीच जबाबदारी निभावतोय. त्यामुळे जरा धीर धरा, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी येत्या १९ मे रोजी नाशिकमध्ये मेळाव्याचे आयोजन केल्याचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नाशिकच्या मेळाव्यात नेत्यांपेक्षा शेतकरीच अधिक बोलतील, असे सांगत नाशिक येथे सेनेच्या पुढील नव्या अभियानाची घोषणा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘जलयुक्त शिवार’मधील दरोडेखोरांना बाहेर काढू!
अधिकारी-कंत्राटदारांच्या मिलीभगतमुळे जलयुक्त शिवार अभियानला गालबोट लागले. तत्कालीन सरकारचा सिंचन घोटाळा आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या घोटाळ््यात बरेच साम्य आहे. काळजी करू नका, ‘जलयुक्त शिवार’मधील दरोडेखोरांना आम्ही नक्की बाहेर काढू, असा इशारा नाव न घेता उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.

‘संवाद’व्हावा, फक्त शिवीगाळ नको!
शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानचा धसका घेत भाजपाने शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी २५ मेपासून ‘शिवार-संवाद’ यात्रेचे आयोजन केल्याचे उद्धव ठाकरे यांना विचारले असता शेतकऱ्यांशी संवाद जरूर व्हावा, फक्त शिवीगाळ नको, म्हणजे कमावलं, असा मार्मिक टोला त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे नाव न घेता लगावला. सरकारच्या कॅशलेस धोरणावर टीका करत कॅशलेसचा व्यवहार फसला असतानाच आता एटीएममध्ये ठणठणाट असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Farmers misunderstood the purchase of tur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.