शेतकऱ्यांची शेडनेट शेतीकडे वाटचाल
By admin | Published: February 3, 2017 09:31 PM2017-02-03T21:31:43+5:302017-02-03T21:31:43+5:30
शेतात आधुनिक प्रयोग करण्याचे धाडस शेतकरी करीत नसल्याने उत्पादनातही वाढ होत नाही
ऑनलाइन लोकमत/ ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा, दि. 3 - शेतात आधुनिक प्रयोग करण्याचे धाडस शेतकरी करीत नसल्याने उत्पादनातही वाढ होत नाही; मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांची शेडनेट शेतीकडे वाटचाल होत असून पारंपरिक शेतीला फाटा देत मिरची, वांगे, टोमॅटो व टरबुज लागवड करून कमी कालावधीत लाखोंचे उत्पादन घेण्याचे तंत्र शेडनेट शेतीच्या माध्यमातून रुळत आहे. जिल्ह्यात ११७ शेडनेट असून, ६ हरितगृह आहेत. शेडनेटमुळे हजारो मजूरांना रोजगार उपलब्ध होत आहे.
प्रत्येक वर्षी तेच पीक व त्यावर खतांबरोबर विविध प्रकारच्या औषधांचा मारा यामुळे शेतीचा कस कमी होऊन शेतातील उत्पादनही कमी होत चालले आहे. त्यामुळे शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान अवलंबल्यास उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचा विकास साधला जाऊ शकतो. शेतात आधुनीकीकरणाची गरज लक्षात घेऊन जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेडनेट शेतीकडे वाटचाल केली आहे.
जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा या तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेडनेट शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. लोणार तालुक्यातील मातमळ व मेहकर तालुक्यातील परतापूर शिवारात मिरची, वांगे, टोमॅटोची शेडनेट शेतीद्वारे लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ११७ शेडनेट असून, ६ हरितगृह आहेत. शेडनेटसाठी लागलेला एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान कृषी विभागाकडून देण्यात येते. शेडनेट शेतीद्वारे शेतकऱ्यांना कमी कालावधीत चांगल्या प्रकारचे उत्पादन झाल्याने काही शेतकऱ्यांनी शेतातच बिजोत्पादन प्रकल्प सुरू केला. मेहकर तालुक्यातील परतापूर शिवारातील शेडनेटची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी येत आहेत. कमी कालावधीत लाखोचे उत्पन्न पाहूण अनेक शेतकऱ्यांनी शेडनेट शेती उभारण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात शेडनेट शेती करण्याचे प्रमाण वाढत असल्याने हजारो मजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
८४ शेडनेट तर ११ हरितगृह मंजूर
शेतीचा प्रयोग मेहकर, लोणार व सिंदखेड राजा तालुक्यात चांगलाच रुळला आहे. दुष्काळावर मात करीत शेतकरी लाखो रुपयांचे उत्पादन शेडनेट शेतीतून घेत आहेत. जिल्ह्यात ८४ शेडनेट व ११ हरितगृह मंजूर आहेत. यासाठी शेडनेटसाठी लागलेल्या खर्चाच्या ५० टक्के अनुदान कृषी विभागाकडून देण्यात येते.
महिलांना मिळाला रोजगार
मिरची, टोमॅटो व टरबुज आदीचे उत्पादन शेतकरी शेडनेट शेतीद्वारे घेत आहेत. एका वेळेला २० ते २५ मजूर एका शेडनेट शेतीमध्ये काम करीत आहेत. परिसरातील हजारो मजुरांच्या हाताला काम मिळत असल्याने मजुरांच्या चेहऱ्यावरह समाधान पाहावयास मिळत आहे. अनेक मजूरांना शेडनेट शेतीमुळे नियमीत रोजगार उपलब्ध झाला असून यामध्ये महिला मजूरांचा मोठ्याप्रमाणावर समावेश आहे.