शेतकरी-अधिकाऱ्यांत उमरगा शाखेत खडाजंगी
By Admin | Published: June 13, 2016 11:31 PM2016-06-13T23:31:01+5:302016-06-13T23:33:47+5:30
उमरगा / परंडा : पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात वर्ग करून घेण्यात येत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांना घेराओ घातला़ ही घटना सोमवारी
पीकविमा : परंड्यात चलन तुटवड्यामुळे संताप
उमरगा / परंडा : पीकविम्याची रक्कम कर्जखात्यात वर्ग करून घेण्यात येत असल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेतील अधिकाऱ्यांना घेराओ घातला़ ही घटना सोमवारी दुपारी उमरगा येथील जिल्हा बँकेच्या शाखेत घडली असून, या घटनेने काही काळ तणाव निर्माण झाला होता़ तर परंडा ‘डीसीसी’ शाखेत चलनतुटवड्यामुळे अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागत होते़ तर अनेकांना तासंतास बँकेत ताटकळत थांबावे लागत आहे़
उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या शेजारील जिल्हा बँकेच्या शाखेतून सोमवारी सकाळी पीकविमा रकमेचे वाटप सुरू करण्यात आले होते़ पैसे उचलण्यासाठी येणाऱ्या काही लाभार्थ्यांच्या खात्यावरून २०० रूपये कपात करून घेण्यात येत होते़ ही प्रक्रिया सकाळपासूनच सुरू होती़ पैसे कपात करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता़ त्याचवेळी प्रवीण चव्हाण या शेतकऱ्याच्या खात्यावरीलही २०० रूपये कपात केल्याचे समोर आले. यामुळे संतापलेल्या चव्हाण यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला़ यावेळी इतर शेतकऱ्यांनीही पैशांची कपात करू नये, अशी मागणी लावून धरत बँकेचे कामकाज बंद पाडले़ त्यावेळी ज्येष्ठ तपासणीस दिलीप जगताप यांनी शेतकरी चव्हाण यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला़ त्यावेळी संतापलेल्या शेतकऱ्यांनी त्यांनाही घेराओ घालून प्रश्नांचा भडीमार सुरू केला़ बँकेतील गोंधळ वाढल्यानंतर गुगळगावचे माजी सरपंच गोविंद तळभोगे व इतरांनी बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार यांच्याकडे याबाबत तक्रार दिली़ त्यानंतर चेअरमन बिराजदार यांनी शेतकऱ्यांची रक्कम कपात करू नये, अशा सूचना दिल्यानंतर बँकेतील तणाव निवळला़
परंडा शहरातील जिल्हा बँकेच्या शाखेला हैद्राबाद ट्रेझरीतून पीकविम्याची रक्कम वाटप करण्यात येते़ मागील दोनच दिवसांपूर्वी भाजपाचे आ़ सुजितसिंह ठाकूर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी मोठा गाजावाजा करीत पीकविमा रक्कमेचे वाटप सुरू केले होते़ त्यावेळी पीकविम्याची रक्कम नियोजनबध्द व वेळेत शेतकऱ्यांना वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या़ बँकेने अ, ब, क, ड पध्दतीने गावनिहाय नियोजन करून पीकविमा वाटपाला प्रारंभ केला होता़ मात्र, सोमवारी हैद्राबाद बँकेकडून अपुऱ्या प्रमाणात चलन तुटवडा झाला़ ग्रामीण भागातील इतर शाखांमध्येही चलन तुटवड्याचा प्रश्न उद्भवला होता़ पेरणीसाठी पैसा आवश्यक असल्याने शेतकरी सकाळपासूनच बँकेत उभा होते़ मात्र, चलन तुटवडा झाल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत होती़ परिणामी शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण होवून, संताप व्यक्त केला जात होता़ शेवटी आ़ सुजितसिंह ठाकूर यांनी हैद्राबाद बँकेतील अधिकारी, व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून चलन तुटवड्याचा प्रश्न मार्गी लावत यापुढील काळात चलनतुटवडा होवू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या़ त्यानंतर पीकविम्याचे वाटप करण्यात आले़ (वार्ताहर)