शेतकऱ्यांनी केली अध्यादेशाची होळी, सुपर एक्सप्रेस हायवेच्या अल्प मोबदल्याचा विरोध
By admin | Published: July 16, 2016 06:27 PM2016-07-16T18:27:03+5:302016-07-16T18:27:03+5:30
मुंबई-नागपूर या सुपर एक्सप्रेस हायवेत जमीन अधिग्रहण धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा अत्यल्प मोबदला मिळणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
धामणगाव रेल्वे/नांदगाव खंडेश्वर, दि. 16 - मुंबई-नागपूर या सुपर एक्सप्रेस हायवेत जमीन अधिग्रहण धोरणाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असली तरी शेतकऱ्यांना त्याचा अत्यल्प मोबदला मिळणार आहे. शेतकऱ्यांवरील अन्यायाविरुद्ध आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात धामणगाव आणि नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयासमोर दीड हजार शेतकऱ्यांनी जाचक शासकीय अध्यादेशाची शनिवारी होळी केली.
७१० किलोमीटर लांबीचा हा महामार्ग धामणगाव १५, चांदूररेल्वे ९, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १९ गावांतून जाणार आहे. यासंदर्भात शनिवारी स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात धामणगाव, चांदूररेल्वे तालुक्यातील साडेसहाशे शेतकऱ्यांची कार्यशाळा महसूल प्रशासनाच्यावतीने आ. वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यात ज्या शेतकऱ्यांची जमिनी जाणार आहे, त्यांना भागिदारी तत्त्वावर मोबदला मिळणार असल्याने त्यांनी कार्यशाळेला हजेरी लावून महामार्ग कसा तयार होणार? कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार? जिरायती, बागायती शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना किती लाभ मिळणार? यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता सुनील देशमुख यांनी माहिती दिली़ दीड तास चाललेल्या कार्यशाळेतील संपूर्ण माहिती शेतकऱ्यांनी ऐकल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणारा अल्प मोबदला लक्षात घेता आ. जगतापांसह सर्व शेतकरी निषेध व्यक्त करीत बाहेर पडले.
जीआरची होळी
जिरायती क्षेत्र असणाऱ्या शेतीला प्रतीहेक्टरी ५० हजार रूपये व बागायती क्षेत्राला प्रतिहेक्टरी १ लाख तसेच प्रतिहेक्टरी वार्षिक अनुदान दरवर्षी १० टक्के वाढ होणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी देताच शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला़ आ़वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर या शासकीय अध्यादेशाची होळी केली. या प्रकल्पात शेतकऱ्यांची भागिदारी कायम ठेवून जिरायती क्षेत्रांना प्रती हेक्टरी १ लाख रूपये तर बागायती क्षेत्रांना प्रतिहेक्टरी २ लाख रूपये एकमुस्त मोबदला प्रथम शासनाने द्यावा, अशी मागणी आ़ जगताप यांनी केली.
बळीराजाने घेतली शपथ
कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करणार नाही, अशी शपथ सर्वच आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली. शासनाने आम्हाला जबरदस्तीने कायदा हातात घेण्यास भाग पाडू नये, असा इशाराही दिला.
- शेतकऱ्यांचा अंत पाहणारे हे सरकार आहे. शेतकऱ्यांचीच जमीन घ्यायची, देश गतिमान करायचा आणि शेतकऱ्यांनाच वाटाण्याच्या अक्षता लावायच्या, हे कदापि खपवून घेतले जाणार नाही.
वीरेंद्र जगताप, आमदार, धामणगाव.