तूर उत्पादक शेतकऱ्यांची होतेय लूट!
By admin | Published: February 7, 2017 05:05 AM2017-02-07T05:05:16+5:302017-02-07T05:05:16+5:30
राज्यात यावर्षी तूर पिकाचे क्षेत्र वाढले असून उत्पादनही एकरी ३ ते ४ क्विंटल आहे; पण नाफेड प्रतवारीचे निकष लावत असल्याने शेतकऱ्यांना बाजारात तूर विकावी लागत आहे
अकोला : राज्यात यावर्षी तूर पिकाचे क्षेत्र वाढले असून उत्पादनही एकरी ३ ते ४ क्विंटल आहे; पण नाफेड प्रतवारीचे निकष लावत असल्याने शेतकऱ्यांना बाजारात तूर विकावी लागत आहे. बाजारात हमीपेक्षाही कमी दराने खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांची लूट होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तुरीला या वर्षी प्रतिक्विंटल ४,६२५ रुपये दर जाहीर करण्यात आला असून, ४२५ रुपये बोनस दिला जाणार आहे, परंतु बाजारात हमीदरापेक्षा कमी दराने तूर खरेदी केली जात असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून झाल्याने शासनाने नाफेडमार्फत खरेदी सुरू केली, परंतु तूर खरेदी करताना नाफेड प्रतवारीचे निकष लावत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना बाजारात तूर विकण्यावाचून पर्याय नसल्याने शेतकऱ्यांची मात्र लूट होत आहे.
दर स्थिरता निधी योजनेंतर्गत २०१६-१७ या वर्षासााठी हमीदर निश्चित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना तूर विक्रीवर प्रतिक्विंटल ४२५ रुपये दर दिले जाणार आहेत. हमीदर व बोनस मिळून शेतकऱ्यांना ५०५० रुपये प्रतिक्विंटल मिळणार आहेत; पण शेतकरी नाफेडला तूर देतच नसल्याने शेतकऱ्यांना बोनसला मुकावे लागणार आहे. नाफेड एफएक्यू प्रतीच्या तुरीला हे दर देणार आहे. यावर्षी तूर विक्रीची रोकड थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
सोमवार आठवड्यातील पहिला दिवस होता. सोमवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीचे सरासरी प्रतिक्विंटल ४,३१० रुपये दर आहेत. प्रत्यक्षात कमीत कमी ४,००० रुपये प्रतिक्विंटल दरानेच खरेदी केली जात आहे. राज्यातील लातूर ही तुरीची मोठी बाजारपेठ आहे. तेथेही हीच स्थिती आहे.
मागील वर्षी ९ ते १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत तुरीचे दर होते. उपलब्ध आकडेवारीच्या विश्लेषणावरू न यावर्षी ५ ,८०० ते ६,५०० रुपये प्रतिक्विंटल राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली होती, हे विशेष. (प्रतिनिधी)