शेतकऱ्यांच्या ‘पोरां’नी बनवला कृषिदर्शिनी अ‍ॅप

By admin | Published: January 5, 2017 03:22 AM2017-01-05T03:22:09+5:302017-01-05T03:22:09+5:30

पिकांचे नवीन वाण, संशोधित जाती, वेगवेगळ्या शिफारशी, वेगवेगळ्या पिकांची शास्त्रोक्त पद्धत यांची माहिती एका क्लिकवर शेतकऱ्यांना मिळावी

Farmer's 'Poran' made a Krishnardini App | शेतकऱ्यांच्या ‘पोरां’नी बनवला कृषिदर्शिनी अ‍ॅप

शेतकऱ्यांच्या ‘पोरां’नी बनवला कृषिदर्शिनी अ‍ॅप

Next

इंदापूर : पिकांचे नवीन वाण, संशोधित जाती, वेगवेगळ्या शिफारशी, वेगवेगळ्या पिकांची शास्त्रोक्त पद्धत यांची माहिती एका क्लिकवर शेतकऱ्यांना मिळावी, असे फुले कृषिदर्शिनी नावाचे अ‍ॅप बनवण्याची किमया इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी केली आहे.
राहुरी कृषी विद्यापीठासाठी बनविलेले हे अ‍ॅप महात्मा फुले कृषी विद्यापीठाने स्वीकारले आहे. राहुरीत दि. ३१ डिसेंबर २०१६ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विश्वनाथ, गुजरातच्या कामधेनू विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. सी. वार्ष्णेय, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते अ‍ॅपचे अनावरण झाले. या वेळी विद्यापीठाचे संचालक डॉ. किरण कोकाटे, कृषी अधिष्ठाता डॉ. भीमराव उल्मेक आदी उपस्थित होते. इंदापूर तालुक्यातील सणसर येथील श्रीराम रायते, बावडा येथील पूनम सातपुते, सार्थक दोशी या तिघांनी हे अ‍ॅप बनवले आहे. सार्थक हा संगणक अभियांत्रिकीच्या तिसऱ्या वर्षात शिकतो. पूनम ही बीएस्सी अ‍ॅग्री पदवीधारक आहे. श्रीराम हा एमएस्सी, एमफिल पदवीधारक आहे. कृषी विद्यापीठांमार्फत दरवर्षी पिकांच्या नवनव्या जाती संशोधित होतात. त्यांच्या लागवडीच्या शिफारशी होतात. हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास काहीसा विलंब होतो. हे पाहून श्रीराम व पूनम या दोघांनी दोन वर्षांपूर्वी या अ‍ॅप्लिकेशनची संकल्पना आखली. संगणक अभियांत्रिकी शाखेच्या सार्थकने ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवताना आपले सारे कौशल्य पणाला लावले. मागील वर्षी पूनम हिने महात्मा फुले विद्यापीठाच्या आविष्कार स्पर्धेत हे अ‍ॅप सादर केले होते. तिचे कौतुक झाले. त्याच्या अनेक चाचण्या यशस्वी झाल्या. काही दिवसांपूर्वी या तिघांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ यांची भेट घेतली. आपल्याच विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या अ‍ॅप्लिकेशनची माहिती घेतल्यानंतर विश्वनाथ यांनीही त्यांचे कौतुक केले. नुकत्याच झालेल्या वार्षिक आढावा कार्यक्रमात कुलगुरूंनी या विद्यार्थ्यांचा सत्कारही केला.
महाराष्ट्रातील सामान्य शेतकऱ्यांना डोळ्यांपुढे ठेवूनच ‘फुले कृषिदर्शनी’ अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात आला आहे. हे अ‍ॅप वापरकर्त्यांना सुलभरीत्या हाताळता येऊ शकते, असे या विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
या अ‍ॅपद्वारे विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या विविध शिफारशी, कृषी हवामानाविषयी माहिती, विविध पिकांची शास्त्रोक्त मशागत पद्धत, विविध शेती पद्धती, पशुसंवर्धन, जलसंवर्धन याविषयी मार्गदर्शन, ठिबक सिंचन, भूजल, मृदा व जलसंधारण, नवीन तंत्रज्ञान, तण नियंत्रण, कीड व्यवस्थापन, कृषी अवजारे यांची सखोल माहिती,
रेशीम उद्योग, गांडूळशेती, आळंबी यांसारख्या जोडधंद्यांविषयी मार्गदर्शन; कृषी अर्थशास्त्र, विद्युत शेतीपंप व सौरऊर्जा अशा भरघोस माहितीचे पर्याय उपलब्ध आहेत.

Web Title: Farmer's 'Poran' made a Krishnardini App

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.