कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! कृषी विभागाचा शासन आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 08:29 PM2024-07-29T20:29:54+5:302024-07-29T20:31:20+5:30

अर्थसंकल्पातील घोषणेनंतर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली महत्त्वाची माहिती

Farmers producing cotton and soyabeans in the season 2023 will get rupees 5000 per hectare | कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! कृषी विभागाचा शासन आदेश जारी

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! कृषी विभागाचा शासन आदेश जारी

Dhananjay Munde, Maharashtra Farmers: सन २०२३च्या खरीप हंगामातील अर्थसंकल्पात केलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना घोषणेप्रमाणे प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज कृषी विभागाने घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय कृषी विभागाने निर्गमित केला आहे.  सन २०२३ मध्ये बहुतांश भागात पावसाचे प्रमाण कमी त्याचबरोबर कापूस व सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. मात्र महायुती सरकारने या शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याची घोषणा लोकसभा निवडणुकीच्या आधीच घोषित केला होता. त्याचबरोबर त्याची अधिकृत घोषणा नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पातही करण्यात आली होती.

या निर्णयाची कृषी विभागाने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात तातडीने अंमलबजावणी केली आहे. राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना किमान १००० रुपये तर २ हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपये या प्रमाणे अर्थसहाय्य देण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.  कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकूण १५४८ कोटी ३४ लाख रुपये इतका तर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी २६४६ कोटी ३४ लाख रुपये असा एकूण ४१९२ कोटी ६८ लाख रुपये इतक्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली आहे.

या अनुदानासाठी ई-पीक पाहणी पोर्टल द्वारे पिकांची नोंदणी केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरणार असून, डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या संलग्न बँक खात्यात ही रक्कम वर्ग केली जाणार आहे. या निर्णयामुळे राज्यात मागील वर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागलेल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून, महायुती सरकारने आपला शब्द पाळला आहे. या निर्णयासह तातडीने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहेत.

Web Title: Farmers producing cotton and soyabeans in the season 2023 will get rupees 5000 per hectare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.