शेतकरी संप : कर्जमाफीसाठी हिंगोलीतील शेतकरी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2017 01:07 PM2017-06-05T13:07:05+5:302017-06-05T13:07:05+5:30

शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला हिंगोलीत कडकडीत बंद पाळून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला.

Farmer's property: Hingoli farmer aggressive for debt waiver | शेतकरी संप : कर्जमाफीसाठी हिंगोलीतील शेतकरी आक्रमक

शेतकरी संप : कर्जमाफीसाठी हिंगोलीतील शेतकरी आक्रमक

Next
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि.5 -  शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बंदला हिंगोलीत कडकडीत बंद पाळून उर्त्स्फुत प्रतिसाद मिळाला. शिवसेनेच्यावतीने या बंदला पाठिंबा दिल्याचे पाहायला मिळाले.
 
हिंगोलीत शिवसेना, शेतकरी संघटना, मराठा शिवसैनिक सेनेने बंदसाठी प्रयत्न केले. सकाळी 7.30 वाजल्यापासून कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. गांधी चौक भागात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, बाजार समिती सभापती रामेश्वर शिंदे, उद्धवराव गायकवाड, भानुदास जाधव, नगरसेवक  सुभाष बांगर, दिनेश चौधरी, संदीप मुदीराज, कडूजी भवर, आनंदराव जगताप, अपक्ष जि.प.सदस्य विठ्ठल चौतमल, शेतकरी संघटनेचे उत्तमराव वाबळे आदी उपस्थिती होते. 
 
शिवसेनेनं सकाळी 7.30 वाजल्यापासून बंद पाळण्याचे आवाहन व्यापा-यांना केले. तर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मराठा शिवसैनिक सेनेचे विनायक भिसे, पप्पू चव्हाण आदींनीही बंदमध्ये सहभाग नोंदविला. यावेळी जिल्हाप्रमुख संतोष बांगर म्हणाले, ""शेतक-यांना कर्जमाफी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. भाजपा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकरीविरोधी आहेत. मागील काही दिवसांपासून शेतक-यांनाच लक्ष्य केले जात आहे. बँकेत पैसे मिळत नाहीत. खते, बियाणाला ऑनलाइनसाठी जास्तीचे पैसे खर्चावे लागत आहेत. शेतीमालाला भाव नाही. भाजपाच्या पाशा पटेल यांनी शेतकरी दिंडी काढली तेव्हा शेतीमालाला जो भाव होता, तोही आज नाही. त्यामुळे आम्ही सत्तेमध्ये असलो तर सत्यासोबत जायचे म्हणून शेतक-यांच्या या आंदोलनात सहभागी झालो आहोत"". 
 
शेतकरी संघटनेचे उत्तमराव वाबळे यांनीही शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी देईपर्यंत शेतक-यांनी हे आंदोलन सुरूच ठेवण्याचे आवाहन केले.
 
औंढ्यात भाजीमंडई बंद, येहळेगावात जाळले टायर 
औंढा नागनाथ : येथे शिवसेनेच्या वतीने डॉ. हेडगेवार चौकातील भाजीमंडई बंद करण्यात आली. तर शहरातही बंदचे आवाहन केले जात होते. तालुक्यातील येहेळगाव सोळंके येथे टायर जाळून रास्ता रोको केला.
येहळेगाव सोळंकेत सकाळी १0 वाजता शेतकरी हिंगोली-परभणी या राज्य महामार्गवर जमले होते. सुमारे ५ ०० च्या वर शेतकरी जमा झाले होते. या वेळी संतप्त शेतक-यांनी रस्त्यावर टायर जाळले. रस्त्याचा दोन्ही बाजूंनी वाहने थांबल्याने एक तास वाहतूक ठप्प होती.  
 
कळमनुरी तालुका आंदोलनांनी पेटला 
मसोड फाटा येथे शेतक-यांनी अर्धा तास रास्ता रोको करून दूध रस्त्यावर फेकले. आखाडा बाळापूर येथेही कडकडीत बंद पाळून कांडली फाटा येथे रास्ता रोको केल्याने सहा किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वारंगा फाटा येथेही बंदमध्ये सहभाग नोंदविला आहे. कळमनुरीतही बंदला प्रतिसाद मिळाला. नांदापूर येथे शेतकरी संपाबरोबरच बँकेत नोटा नसल्याने बँकेला टाळे ठोकले.

वसमत तालुक्यात रास्ता रोको
शेतकरी संपाला पाठिंबा देत वसमत बंदचे आवाहन करण्यात आले होते. सोमवारी बंदला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले. तालुक्यातील बोराळा पाटी येथे रास्ता रोको केला. त्यामुळे वाहतूक ठप्प होती. सकाळपासूनच कार्यकर्ते कामाला लागल्याने व्यापा-यांनी बंदला प्रतिसाद दिला. तालुक्यात कुरुंदा बाजारपेठही बंद होती. तर हट्टा येथील बाजारपेठ कार्यकर्त्यांनी बंद करून प्रशासनाला निवेदन दिले.
 
सेनगावात कडकडीत बंद
तालुक्यात शेतकरी संपाला समर्थन म्हणून सेनगाव कडककडीत बंद ठेवण्यात आले. तर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला. एक तास हे आंदोलन चालले. तालुक्यात गोरेगाव बंद होते. पुसेगाव, हत्ता, आजेगाव, पानकनेरगाव, सवना, साखरा येथेही बंद आहे. 
 
गोरेगावात प्रतिकात्मक पुतळादहन; तेरावं घालणार 
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे गावामधून डफडे लावून अंत्ययात्रा काढत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
 
गोरेगावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शोकसभा घेत सरकार मुर्दाड असल्याच्या घोषणा देत तीव्र निषेध केला. याप्रसंगी कर्जमाफीसह विविध मागण्या पूर्ण न झाल्यास वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन आणखी तीव्र करीत सुरूच ठेवण्याचा शेतक-यांनी निर्धार केला. अंत्यविधीनंतर पायात पादत्राने घालून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तर यापुढे पारंपरिक पद्धतीने पुतळा दहनानंतरचे रक्षा विसर्जन, गोडजेवण, तेरवी आदी विधी करून आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार शेतक-यांनी केला.                        
 

 

Web Title: Farmer's property: Hingoli farmer aggressive for debt waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.